गड-किल्ल्यांवर उलगडला पहिल्या राष्ट्रध्वजाचा इतिहास

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 August 2019

पालघर जिल्ह्यात मानवंदना; किल्ले वसई मोहीम परिवारातर्फे जयजयकार 

विरार  ः किल्ले वसई मोहीम परिवारातर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही शनिवारी (ता. 17) आणि रविवारी (ता. 18) पालघर जिल्ह्यातील गडकोटांवर आणि कोल्हापूर प्रांतातील ग्रामीण भागात दोन दिवस भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाचा जयजयकार करून त्याला मानवंदना देण्यात आली. विभागवार नेमण्यात आलेल्या दुर्गमित्रांनी व सामाजिक प्रतिनिधींनी आपापल्या भागातील स्थळांवर स्थानिक नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना, दुर्गमित्रांना, पर्यटकांना पहिल्या राष्ट्रध्वजाचा इतिहास व त्यामागील परंपरा याबाबत मार्गदर्शन केले. 

जर्मनमधील स्टुटगार्ड या शहरात  22 ऑगस्ट 1907 ला जागतिक समाजवाद्यांची परिषद भरली होती. त्या ठिकाणी भारताच्या प्रतिनिधी म्हणून असलेल्या मादाम कामांनी युनियन जॅक न घेता आपल्या कल्पनेने साकार केलेला स्वतंत्र असा ध्वज भारताचा म्हणून सादर केला.

मादाम कामा यांनी 1907 मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ड शहरात भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचा आद्य राष्ट्रध्वज फडकवला. ऑगस्ट 1927 मध्ये या ध्वजाचे भारतात आगमन झाले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या व विविध ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असणाऱ्या ध्वजास आपण भारताचा पहिला राष्ट्रध्वज म्हणून संबोधतो. 2007 पासून किल्ले वसई मोहीम परिवार या पहिल्या राष्ट्रध्वजाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी मानवंदना आणि स्मरण मोहीम राबवते. यंदा या ध्वजास 112 वर्षे पूर्ण झाली. 

यानिमित्त मिकिल्ले वसई मोहीम परिवारातर्फे मानवंदना मोहीम राबवण्यात आली. यंदा उत्तर कोकणातील जंजिरे धारावी उत्तन चौक कोट, जंजिरे घोडबंदर कोट, जंजिरे मांडवी कोट, हिराडोंगरी दुर्ग- दातिवरे गाव या स्थळांवर पहिल्या राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. 

पूरग्रस्तांच्या मदतीस हातभार 
यंदा मुसळधार पावसाने कोल्हापूर, कोकण भागात अतोनात नुकसान झाले. याची सामाजिक जाणीव ठेवून जिल्ह्यातील सामाजिक उपक्रमात कार्यरत असणाऱ्या दुर्गमित्र संघटना युवा शक्ती प्रतिष्ठान, पालघर व जनता जागृती मंच मुंबई यांच्या सहकार्याने पूरग्रस्त भागासाठी मदत गोळा करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: History of the First Nation Flag Exposed on Fortresses In Virar