मंत्रालयातील दालन क्रमांक 602 नवीन सावजाच्या प्रतिक्षेत

प्रशांत बारसिंग
Friday, 29 November 2019

राजकीय बळी घेणारे मंत्रालयातील दालन क्रमांक 602 नवीन सावजाच्या प्रतिक्षेत

मुंबई :  राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी आज संपन्न झाला. ठाकरे यांच्यासह त्यांच्या मंत्रीमंडळातील सदस्य मंत्रालयातील कार्यालयांचा उद्यापासूनच ताबा घेणार आहेत. मात्र अत्यंत गमतीचा भाग म्हणून प्रशासनात चर्चा आहे ती, सहाव्या मजल्यावरील दालन क्रमांक 602. गेल्या वीस वर्षात या दालनातील तब्बल आठ मंत्रयांना घरी बसावे लागल्याचा इतिहास असून आता मंत्री म्हणून नवीन सावजाच्या तयारीत हे दालन असल्याची चर्चा आहे. 

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर 601 क्रमांकाचे दालन मुख्यमंत्रयांसाठी आहे. त्यांच्यानंतर मंत्रीमंडळातील दुस-या क्रमांकाच्या मंत्रयासाठी 602 क्रमांकाचे दालन राखीव आहे. मात्र गेल्या वीस वर्षातील इतिहास पाहाता या ठिकाणच्या कोणत्याही मंत्रयाला आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही किंवा विविध आरोपामुळे राजीनामा द्यावा लागला आहे.

1999 साली कॉंग्रेस आघाडीची सत्ता आल्यावर छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना त्यांनी या दालनातून कारभार चालविला होता. कालांतराने त्यांच्यावर तलगी घोटाळयाचे आरोप झाले आणि उपमुख्यमंत्रीपद त्यांना सोडावे लागले होते. आर.आर.पाटील गृह तथा उपमुख्यमंत्री असताना 26/11 चा दहशतवादी हल्ला मुंबईवर झाला होता. तेव्हा विलाराव देशमुख यांना मुखमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले व नंतर आर.आर.आबांनाही राजीनामा द्यावा लागला होता. आघाडी सरकारच्या अंतिम टप्प्यातील कार्यकाळात अजित पवार उपमुख्यमंत्री होते. मात्र त्यापूर्वी ते जलसंपदा खात्याचे मंत्री असताना पूर्वीच्या कार्यकाळातील सिंचनाच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि संतापून अजित पवार यांनी राजीनामा दिला होता. 

सन 2014 साली सत्तांतर झाल्यावर दुस-या क्रमांकांचे मंत्री म्हणून एकनाथ खडसे यांच्या वाटयाला हे दालन आले. दीड दोन वर्षातच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर त्यांना पायउतार व्हावे लागले. खडसे यांच्यानंतर मंत्रीमंडळाच्या विस्तारात पांडुरंग फुंडकर कृषी मंत्री झाले आणि त्यांही याच दालनातून कारभार सुरू ठेवला. परंतू फुंडकर यांच्या दुर्देवी मृत्यंनंतर दालन रिकामे झाले. फडणवीस सरकारच्या शेवटच्या मंत्रीमंडळ विस्तारात डॉ. अनिल बोंडे कृषीमंत्री झाले. आणि अवघ्या तीन महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभवही झाला. मंत्रीमंडळ विस्तारात अनेक मंत्रयांचा समावेश झाल्याने या दालनाचे तीन भाग करण्यात आले होते. मुख्य दालनात डॉ. बोंडे यांचा कारभार सुरू असताना दुस-या भागात राज्यमंत्री अर्जुन खोतकर तर तिस-या भागातून सदाभाउ खोत कारभार हाकत होते. परंतू आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बोंडे यांच्यासह खोतकर पराभूत झाले तर भाजपची सत्ता गेल्याने सदाभाउ खोत मंत्री नसतील. असा नकारात्मक इतिहास असलेले हे दालन आता नव्या मंत्रयाच्या प्रतिक्षेत असल्याची चर्चा मंत्रालयात सुरू आहे. 

602 दालनातील दुर्देवी मंत्री : 

 

  • छगन भुजबळ 
  • आर.आर.पाटील 
  • अजित पवार 
  • एकनाथ खडसे 
  • पांडुरंग फुंडकर 
  • डॉ. अनिल बोंडे 
  • अर्जुन खोतकर 
  • सदाभाउ खोत 

 
WebTitle : history of room number 602 of mantralaya explained in detail


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: history of room number 602 of mantralaya explained in detail