घरोघरी व्हॅक्‍यूम क्‍लीनर, डिशवॉशरची मागणी! कोरोनामुळे घरकामगार नसल्याचा परिणाम

कृष्ण जोशी
Wednesday, 11 November 2020

लॉकडाऊनमध्ये घरकाम करणाऱ्या महिला येत नसल्याने अनेक घरांमध्ये डिशवॉशर आणि व्हॅक्‍यूम क्‍लीनर खरेदीवर ग्राहकांनी भर दिला.

मुंबई ः लॉकडाऊनमध्ये घरकाम करणाऱ्या महिला येत नसल्याने अनेक घरांमध्ये डिशवॉशर आणि व्हॅक्‍यूम क्‍लीनर खरेदीवर ग्राहकांनी भर दिला. आता दिवाळी दोन दिवसांवर आल्याने कपडे खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. लॉकडाऊननंतर जूनमध्ये दुकाने उघडल्यावर डिशवॉशरचा खप सर्वांत जास्त झाला. नेहमीच्या तुलनेत अडीच पट डिशवॉशर खपले व अजूनही तोच कल आहे, असे अंधेरीच्या सोनी-मोनी इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे राजू शहा यांनी सांगितले.

 नववी-बारावीचे वर्ग सुरू! 40 मिनिटांच्या चार तासिका, मोकळ्या जागेत वर्ग घेण्यास मुभा

घरकाम करणाऱ्या स्त्रिया येत नसल्याने लॉकडाऊनमध्ये ही कामे घरातील सदस्य स्वतःच करीत होते. ते श्रम कमी होण्यासाठी लोक 30 ते 50 हजार रुपयांपर्यंत किंमत असलेले डिशवॉशर घेत आहेत. खरे म्हणजे डिशवॉशर हा प्रकार तसा किमान दहा वर्षांपासूनचा आहे; मात्र या लॉकडाऊननंतर त्याला चांगलाच उठाव आला आहे. भविष्यात याला वॉशिंग मशीनसारखी मागणी येईल, असेही शहा म्हणाले. 
घर कामगार गावी गेल्याने किंवा त्यांना इमारतीत परवानगी नसल्याने लोकांनी घराच्या साफसफाईसाठी व्हॅक्‍यूम क्‍लीनरला पसंती दिली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅक्‍यूम क्‍लीनरची किंमत पाच हजारांपासून ते 15 हजारांपर्यंत आहे. यंत्रमानवासारखा ऍटोमॅटिक क्‍लीनर तर 50 हजारांपासून ते एक लाखापर्यंत आहे. याला एकदा साऱ्या घरात नेऊन स्वच्छता करून घेतली की तो प्रोग्राम फीड करतो व पुढच्या वेळी त्याला टाईमिंग सेट करून ठेवले की तो त्या वेळेला स्वतःच साऱ्या घराचा केर काढून घराची फरशी पुसतो. व्हॅक्‍यूम क्‍लीनरची विक्रीही नेहमीच्या तुलनेत तिप्पट झाली, असेही त्यांनी सांगितले. 

 

आता दिवाळीपूर्वी ग्राहक येण्यास सुरुवात झाली आहे. लग्नासाठीचे विशेष कपडे तसेच नेहमीच्या खास कपड्यांनाही मागणी आहे. जूनपेक्षा विक्री दुप्पट झाली आहे; पण अजूनही ती गेल्या वर्षीच्या तुलनेत एक तृतीयांश एवढीच आहे. लग्नानिमित्तच्या सुंदर साड्या, चणिया चोळी, पुरुषांचा कुर्ता-चुडीदार यांना मागणी आहे. अर्थात सध्या विवाहसोहळेच कमी होत असल्याने या कपड्यांच्या विक्रीचे प्रमाणही कमी आहे; पण त्याखेरीज स्त्री-पुरुषांचे नेहमीचे कपडे, शर्ट-पॅंट, मुलांचे कपडे, किचन वेअर यांनाही मागणी आहे. 
-विरेन शहा,
मालक, रूपम शॉप 

 

मोबाईलसोबत लागणाऱ्या वस्तूंची (ऍक्‍सेसरीज) विक्री फारशी होत नाही. मोबाईलच्या टेंपर्ड ग्लास, कव्हर, इयरफोन, हॅंडल आदींची विक्री करतो. मागील दिवाळीच्या तुलनेत यंदा विक्री जेमतेम 20 टक्के झाली आहे. लोकांची आर्थिक स्थिती अजूनही सुधारली नसल्याचेच हे लक्षण आहे. 
- अस्लम मलकानी,
विक्रेत, क्रॉफर्ड मार्केट 

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Vacuum Cleaner Dishwasher Demand The result of the corona not being a domestic worker

टॉपिकस