Hope of life | मुंबई पालिका उभारणार कर्करोग रुग्णालय; अत्याधुनिक उपचार पद्धतीचा समावेश

समीर सुर्वे
Thursday, 4 February 2021

मुंबई महापालिका मुंबईत कर्करोग रुग्णालय उभारणार असून त्यात प्रोटॉन थेरपीसारख्या अत्याधुनिक उपचार पद्धतीचा समावेश असेल

मुंबई  : मुंबई महापालिका मुंबईत कर्करोग रुग्णालय उभारणार असून त्यात प्रोटॉन थेरपीसारख्या अत्याधुनिक उपचार पद्धतीचा समावेश असेल. त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, असे आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांनी जाहीर केले. जागतिक कर्करोग दिनाच्या पूर्वसंध्येला अशी घोषणा करण्यात आली आहे. 

"सकाळ'ने "होप ऑफ लाईफ' अभियानांतर्गत गेल्या वर्षी वर्षभर मुंबईत कर्करोगाबाबत अभियान राबवले होते. त्याअंतर्गत मुंबई, महामुंबई आणि राज्यातील कर्करोग रुग्ण व उपचारपद्धतीबद्दल वृत्तमालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. मुंबईत "टाटा' वगळता कर्करोगासाठी स्वतंत्र रुग्णालय नाही. काही रुग्णालयांत रेडिओ थेरपी आणि शस्त्रक्रिया केल्या जातात; मात्र वाढत्या कर्करुग्णांची संख्या लक्षात घेऊन मुंबईत स्वतंत्र कर्करोग रुग्णालयाची आवश्‍यकता असल्याचे "सकाळ'च्या वृत्तमालिकेतून अधोरेखित झाले होते. मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या जागी पूर्वी कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार होते; मात्र नंतर त्याबाबतचा पर्याय बारगळला होता. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई महापालिकेने कर्करोगासाठी रुग्णालय तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात प्रोटॉन थेरपीसारखी अत्याधुनिक सुविधा सुरू करण्यात येणार आहे. अशी सुविधा देशातील ठराविक रुग्णालयांतच आहे. नवी मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात अशी उपचार पद्धती आहे. आता ती मुंबईतही उपलब्ध होणार आहे. 

अशी असते प्रोटॉन थेरपी 
कर्करोगावर उपचार करण्यासाठी रेडिएशन उपचार पद्धती वापरली जाते. त्यात रुग्णाच्या कर्करोग पेशींबरोबरच शरीरातील इतर पेशींवरही परिणाम होतो; मात्र प्रोटॉन थेरपीमध्ये उपचारात वापरली जाणारी किरणे थेट कर्करोगाच्या पेशीवर सोडली जातात. त्यामुळे त्या पेशींच्या आजूबाजूच्या भागाला फारशी इजा होत नाही. कर्करोगाच्या उपचारासाठी वापरली जाणारी ही जगातील सर्वांत आधुनिक पद्धती आहे.

---------------------------------------------

Hope of life Mumbai city marathi news BMC to set up a cancer hospital cancer day

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hope of life Mumbai city marathi news BMC to set up a cancer hospital cancer day