मुंबईत हॉटेलचालकांचा पहिला दिवसाचा अनुभव खट्टा मिठा

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 6 October 2020

मुंबईत 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरु झाले. मात्र हॉटेल सुरु झाल्यावर  पहिल्या दिवशी ग्राहकांचा कमी प्रतिसाद मिळाला. मात्र दुसरीकडे हॉटेल सुरु झाल्यानं हॉटेलमालक आनंदात आहेत.

मुंबई: मुंबईत 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरु झाले. मात्र हॉटेल सुरु झाल्यावर  पहिल्या दिवशी ग्राहकांचा कमी प्रतिसाद मिळाला. मात्र दुसरीकडे हॉटेल सुरु झाल्यानं हॉटेलमालक आनंदात आहेत. अनेक ठिकाणी सॅनिटायझरबरोबरच गुलाबपुष्प देऊन खवय्यांचे आनंदात स्वागत करण्यात आले. लवकरच परिस्थिती सुधारेल असा आशावादही हॉटेलमालकांनी व्यक्त केला. 

गेले सहा ते सात महिने हॉटेल बंद असल्याने खवय्यांना पार्सल मागवून दुधाची तहान ताकावर भागवायला लागत होती. त्यामुळे सोमवारी हॉटेलांमध्ये प्रवेश करताना काहीशी उत्सुक्तता काहीशी कोरोनाची भीती, काहीशी सरकारी नियमांबाबत साशंकता अशी मनस्थिती हॉटेलचालकांची आणि ग्राहकांची देखील होती. अनेक हॉटेल तर या गोंधळामुळे उघडलीच नाहीत. तरीही ग्राहकांच्या प्रतिसादामुळे आम्ही समाधानी आहोत, तीस ते चाळीस टक्के हॉटेल उघडली आहेत आणि आज कमी ग्राहकक्षमता पाहता नेहमीच्या तुलनेत चाळीस टक्के धंदा झाला. मात्र लवकरच परिस्थिती सुधारेल, असे आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले. 

प्रभादेवी - सोमवारी दादर परिसरातील हॉटेलमध्ये खवय्यांनी हजेरी लावल्याचे पाहावयास मिळाले, अर्थात एकंदर प्रतिसाद संमिश्र होता. सरकारच्या कठोर नियमावलीमुळे तसेच कर्मचारी नसल्यामुळे काही हॉटेल मालकांनी फक्त पार्सल सेवाच सुरू ठेवली.

सेनाभवन जवळील हॉटेल मनोहरमध्ये सकाळपासून खवय्यांची वर्दळ सुरू होती. मर्यादित ग्राहकांना घेण्याची मुभा असल्याने एका टेबलवर एक किंवा दोन व्यक्तीना तोंडावर बसविण्यात आले होते. हॉटेल व्यवस्थापक किंवा वेटर यासंदर्भात त्यांना मार्गदर्शन करीत होते. येणाऱ्या ग्राहकांची थर्मल तपासणी करून त्यांना सॅनिटायझर देखील देण्यात येत होते. राज्य सरकारने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून हॉटेल सुरू करण्यात आले असून  प्रत्येक ग्राहकांची नोंद वहीमध्ये करण्यात आली. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना टोपी, हातमोजे आणि मास्क देण्यात आल्याचे हॉटेलचे मनोहरचे मालक राहुल बंगेरा यांनी सांगितले.

हॉटेल जरी सुरू झाले असले तरी ग्राहक हॉटेलमधून बसून खाण्यास घाबरत आहे. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद कमी प्रमाणात मिळत असल्याचे हॉटेल मिसळ जंक्शनचे मालक सुयोग भट्टे यांनी सांगितले. सरकारच्या अटी खूप कठोर असल्याने तसेच रेल्वे बंद असल्याने कर्मचारी येऊ न शकल्याने सध्या तरी हॉटेल सुरू करण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे पार्सल सेवा देण्यावरच आमचा भर असल्याचे तृप्ती हॉटेलच्या मालकांनी सांगितले. एक दिवस आधीच नियमावली  मिळाल्याने त्याची अंमलबजावणी करण्यास वेळ लागणारच, तसेच सगळे कामगार कामावर यायलाही वेळ लागेल. त्यामुळे तूर्तास तरी हॉटेल सुरू करण्यास विलंब लागेल अशी प्रतिक्रिया आस्वाद हॉटेलचे मालक सूर्यकांत सरजोशी यांनी दिली. 

घाटकोपर:  सोमवारी हॉटेल सुरू करण्यास व्यावसायिकांनीच अल्प प्रतिसाद दिला. अनेक बार आणि रेस्टोरंट बंद होती, जी सुरू होती त्यातही कर्मचारी कमी असल्याने ग्राहकांच्या ऑर्डर पूर्ण करताना त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. घाटकोपरच्या राधाकृष्ण हॉटेलमध्ये ट्रॅव्हल्सचे बसचालक, रिक्षाचालक, शासन कर्मचारी यांची रेलचेल असते. नेहमीप्रमाणे जरी गर्दी नसली तरी हॉटेलमध्ये पुरेसे कर्मचारी नसल्याने ग्राहकांना सुविधा देताना मोठी अडचण आली, कर्मचारी कमी असल्याने मेनूदेखील कमी केल्याचे हितेश शेट्टी यांनी सांगितले.

नाईट ड्युटी नंतर सकाळी पहिला नाश्ता या हॉटेलमध्ये असतो, गेले सहा महिने यात खंड पडला. पूर्वी आम्ही दर आठवड्याला कुटुंबासहित येथे जेवण करायचो, मात्र आता सर्वांना आणता येणार नाही. एक दोन महिने परिस्थिती कशी आहे हे पाहून पुढे कुटुंबासाहित हॉटेल मध्ये जेवणाचा आनंद घेऊ. 

बबन पाटोळे, ग्राहक. 

मुंबादेवी: सोमवारी दक्षिण मुंबईत मोजकीच हॉटेल सुरु झाली, डोंगरी येथील दिल्ली दरबार जाफर भाई रेस्टोरेन्ट अजूनही सुरु झालेले नाही. तर भेंडी बाजार येथील शालीमार हॉटेलमध्ये मॅनेजर वासीम पठाणे हे खाद्यप्रेमीचे गुलाबपुष्प देत स्वागत करीत होते. पाहण्यासाठी मालक उमेर शेख स्वतः सकाळपासून हजर होते. आता हळुहळू व्यवसाय वाढत जाईल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली. सोमवारी आवडीच्या पदार्थांवर मनसोक्त  ताव मारून मागची कसर भरून काढणार, असे अकबर खान आणि अमोल वानखेडे या खवय्यांनी सांगितले. 

मेट्रो सिनेमा जवळ मेरबान यांचे शंभर वर्षे जुने ससानियन रेस्टोरंट आहे, सध्या आम्ही फक्त मावा केक, पॅनकेक, फ्रूटी केक, प्लम्प केक, ब्रेड आणि ते देखील फक्त पार्सल देत आहोत. सरकारचा लेखी आदेश मिळाला की पाहू, नोकरवर्गही कमी आहे, सध्या व्यवसाय परवडत नाही,  असेही ते म्हणाले. हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश, बिहार येथील कामगार अजून कामावर आलेच नाहीत असे हॉटेल व्यवसायिक मनोज म्हात्रे यांनी सांगितले.

गोरेगाव:  कर्मचारी कमी, बार सुरु करताना तयारीला वेळ मिळाला नाही, 33 टक्के ग्राहकांना प्रवेश देण्याची अट आमचा तोटा वाढवणारी आहे, अशा तक्रारी बारमालकांनी केल्या. 

मीनाक्षी बारच्या संतोष पुंजा शेट्टी यांनी सांगितले कि, बाहेरगावचे कर्मचारी न आल्यामुळे वातानुकुलीत हॉल आणि अन्य एक हॉल बंद ठेवला आहे. फक्त दोघांनी पार्सल मद्य नेले. वर्षाचे आठ लाख परवाना शुल्क सरकारकडे भरले खरे, मात्र धंदा किती मिळणार याची शाश्वती नाही. तर ग्राहक येत नसल्याने बार बंद ठेवला आहे, मद्याचे पार्सल कोणीही नेत नाही, त्यामुळे आठवडाभर बार बंदच ठेऊ असे रत्नागिरी फॅमिली बार आणि रेस्टॉरंट च्या यशवंत देवाडिया यांनी सांगितले. 

वाईन शॉपपेक्षा बारमध्ये मद्य महाग मिळते, तसेच बारमध्ये बसून पिण्यास भीती वाटते, त्यामुळे सध्यातरी बार नकोच, असे वाईन शॉपमधून मद्य घेणाऱ्या किरण जयस्वाल यांनी सांगितले. संध्याकाळपर्यंत बारमध्ये गिऱ्हाईक नव्हते, किचनमधील साहित्य नादुरुस्त आहे, फ्रीज बंद आहे, कर्मचारी नाही, असे हेरीटेज बिअर बारच्या प्रसाद पुजारी यांनी सांगितले.

---------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Hotel started Mumbai Short response from customers Reactions hotel operators


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hotel started Mumbai Short response from customers Reactions hotel operators