दैव देतं अन कर्म नेतं...त्यांच्यावर घरे गमावण्याची वेळ!

 दैव देतं अन कर्म नेतं...त्यांच्यावर घरे गमावण्याची वेळ!
दैव देतं अन कर्म नेतं...त्यांच्यावर घरे गमावण्याची वेळ!

नवी मुंबई : सिडकोने 15 हजार घरांसाठी काढलेल्या सोडतीमधील मुदतीत हप्ते न भरल्यामुळे शेकडो भाग्यवंतांना आपले घर गमावण्याची वेळ आली आहे. या लॉटरीत यशस्वी झालेल्या अर्जदारांना तीन टप्प्यातील रक्कम भरण्यासाठी 180 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, बॅंकांनी गृहकर्जाची प्रक्रिया किचकट बनविल्यामुळे शेकडो यशस्वी अर्जदारांना दिलेल्या मुदतीत पैसे भरता आलेले नाहीत. मुदत संपल्यामुळे पैसे स्वीकारणारी ऑनलाईन यंत्रणा बंद झाली असल्याने भाग्यवंतांना सिडकोच्या पणन विभागात फेऱ्या माराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे अनेकांनी हप्ते भरूनसुद्धा काही हप्ते चुकल्यामुळे त्यांना घर गमावण्याची वेळ आल्याने अनेक ग्राहक तणावाखाली आले आहेत. 

सिडकोने काढलेल्या 15 हजार घरांच्या सोडतीनंतर सर्व यशस्वी अर्जदारांची पात्रता तपासली आणि त्यानंतर पात्र ठरलेल्या अर्जदारांना सप्टेंबर 2019 मध्ये वाटपपत्र देण्यात आले. त्यानुसार बहुतेक अर्जदारांना पहिला हप्ता ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरायचा होता. दुसरा हप्ता डिसेंबर 2019 आणि तिसरा हप्ता जानेवारी 2020 मध्ये भरणे अपेक्षित होते. मात्र हे हप्ते भरताना अनेक अर्जदारांना अडचणी आल्या. काही अर्जदारांना पहिला हप्ताही भरता आला नाही. त्यामुळे सिडको प्रशासनाने नियमित हप्ते न भरणाऱ्या अर्जदारांसाठी 180 दिवसांची अंतिम मुदत दिली होती. ही मुदत शनिवारी (ता.8) संपली. या शेवटच्या दिवसांत अनेक अर्जदारांनी पैसे उसनवारीने घेऊन, तिन्ही हप्ते भरण्याचा प्रयत्न केला. मात्र एकदम ताण पडल्यामुळे पैसे स्वीकारणारी ऑनलाईन यंत्रणा कोलमडली होती. त्यामुळे काही ग्राहकांचा एक हप्ता भरला जाऊन बाकीचे हप्ते भरता आले नाहीत. ज्या ग्राहकांनी शुक्रवारी आणि शनिवारी हप्ते भरले, त्यांनी सोमवारी पुन्हा पैसे भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, संकेतस्थळ सुरूच झाले नाही. सिडकोने अशा ग्राहकांची घरे रद्द केल्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याबाबत पणन विभागाचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत डावरे यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही. 

व्यवस्थापकीय संचालकांना साकडे 
पैसे भरण्याची मुदत संपल्यानंतर जवळपास 100 अर्जदारांनी पैसे भरण्यास तयार आहोत, घर रद्द करू नये. आमचे पैसे स्वीकारण्यात यावेत, अशी विनंती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना केली. आजही अनेक अर्जदारांनी ऑनलाईन अर्जांबरोबर थेट व्यवस्थापकीय संचालकांनाकडेही आमचे घरे वाचवा, अशी विनंती केली. 

बॅंकेच्या घोळामुळे ग्राहकांचे नुकसान 
पहिला आणि दुसरा हप्ता भरल्यानंतरही घरांचे वाटप रद्द झाले, तर अर्जदारांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यांनी लॉटरीमध्ये सहभागी होण्यासाठी सुरुवातीला भरलेली अनामत रक्कम जप्त होणार असून, भरणा केलेल्या रकमेमधून दहा टक्के कपात केली जाणार आहे. जीएसटीची रक्कमही परत मिळणार नाही. त्यामुळे ग्राहकांचे अतोनात नुकसान होणार आहे.

ज्या ग्राहकांनी जमा केलेल्या हप्त्यांपैकी एक-दुसरा हप्ता चुकला असेल. अशा ग्राहकांना मुदतवाढ देण्याबाबत विचार सुरू आहे. परंतू, एकही हप्ता भरलेला नसलेल्या ग्राहकास मुदतवाढ दिली जाणार नाही.
- लक्ष्मीकांत डावरे, व्यवस्थापक, पणन विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com