बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना मी काडीचीही किंमत देत नाही - मुख्यमंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray
बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना मी काडीचीही किंमत देत नाही - मुख्यमंत्री

बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना काडीचीही किंमत देत नाही : मुख्यमंत्री

मुंबई : भोंग्यांच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी BEST च्या एका कार्यक्रमात भाष्य केलं. बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना आपण काडीचीही किंमत देत नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. (I dont care to those who play useless loudspeaker CM Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, "ज्यांना अ‍ॅसिडीटी झाली आहे, पोटात आगडोंब उसळला आहे. ज्यांना जळजळतंय मळमळतंय आणखी काय होतंय माहिती नाही. पण त्यांच्या राज्यात त्यांनी मुंबई महापालिकेच्या शाळांचा दर्जा अंगिकारुन दाखवावा, हे माझं उघड आव्हान आहे. पण करायचं काही नाही आणि बिनकामाचे भोंगे वाजवायचे हाच त्यांचा उद्योग आहे, अशा लोकांना मी काडीची किंमत देत नाही"

बीएसटी नंबर वन

अनेक उपक्रमात आपली बीएसटी नंबर एक आहे. खरतंर महापालिका आणि सरकारला माहितीए की बीएसटी आपण कशी चालवतो. अनेक आर्थिक संकटातून आपण मार्ग काढला आहे. यापुढे आता बीएसटी चालू शकेल की नाही? असाही प्रसंग काही वेळाला आला होता. जसा एसटीचा विषय आहे तसाच विषय बीएसटीचाही आहे. अत्यंत माफक दरात उत्तम सोय द्यायची ही काही साधीसुधी गोष्ट नाही. त्यातही दर्जा द्यायचा ही साधीसुधी गोष्ट नाही.

महापालिकेच्या शाळांसह आता खासगी शाळांनाही 'ही' सुविधा

मुख्यमंत्री म्हणाले, अभिमानानं आणखी एक गोष्ट सांगतो. मुंबईकर आमच्यावर का प्रेम करतात तर गेल्या महापालिका निवडणुकीत आपण एक वचन दिलं होतं की, महापालिकेच्या शाळेचा युनिफॉर्म घातलेला असेल तर प्रवास फुकट. आज सांगतो की, खासगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आपण ही सुविधा देणार आहोत. पाचवीपर्यंत २०० रुपये, पाचवी ते दहावीपर्यंत अडीचशे रुपये आणि बारावीपर्यंत साडे तीनशे रुपयांचा पास आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत. ही सुविधा देत असताना महापालिकेच्या शाळा कशा सुधारतो आहोत याकडे आपण लक्ष देत आहोत. त्यामुळं आता मुंबई महापालिकेबाबत आता असा विचार होतोय की, माझ्या पाल्याला आता खासगी शाळेत नाही तर महापालिकेच्या शाळेत शिकवेन. यावेळी अॅप आधारित बेस्ट ऑरेंज सेवा लवकरात लवकर सुरु करण्याचं आवाहन महाव्यवस्थापकांना दिले.