ICMRचा दुसरा सेरो सर्व्हे अहवाल सादर, मुंबईतली परिस्थिती चिंताजनक

पूजा विचारे
Wednesday, 30 September 2020

ICMR नं दुसऱ्या सेरो सर्व्हेचा अहवाल जाहीर झाला आहे. या सेरो सर्व्हेनुसार, देशातील 10 वर्षाखालील प्रत्येक 15 व्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबईः  कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशातच ICMR नं दुसऱ्या सेरो सर्व्हेचा अहवाल जाहीर झाला आहे. या सेरो सर्व्हेनुसार, देशातील 10 वर्षाखालील प्रत्येक 15 व्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यात भारतातील नवी दिल्ली आणि मुंबई या दोन मोठ्या शहरांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

राज्यातील बऱ्या होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ झाली, शिवाय मृत्यू संख्येतही घट झाली. गेल्या चार महिन्यांत एका दिवसातील सर्वाधिक कमी मृत्यूची नोंद 28 सप्टेंबरला झाली. मात्र मुंबईतील कोरोनाबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 

इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने दुसरा राष्ट्रीय सेरो सर्व्हे अहवाल जारी केला. 17 ऑगस्ट ते 22 सप्टेंबरदरम्यान हे सेरो सर्व्हेक्षण करण्यात आलं. सेरो सर्व्हेच्या आकडेवारीनुसार,  झोपडपट्टी परिसरात 15.6% लोकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज सापडल्यात. झोपडपट्टी नसलेल्या परिसरात हे प्रमाण 8.2% आहे तर ग्रामीण भागात 4.4%  आहे. मुंबईमध्ये झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे. त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसचा प्रसार होत असून याबाबतची कोणालाच कल्पना नाही आहे. 

नवी दिल्ली आणि मुंबई या शहरांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या शहरांमध्ये झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या भागात मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आले. याच कारणानं कोरोनाची साथ या शहरात सगळीकडे पसरली. या ठिकाणी असलेल्या दाट लोकवस्तीच्या घरांमुळे लोकांना एकमेकांपासून दूर राहण्यास अडचण निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं भागात अशक्य होतं. या सर्व्हेनुसार या दोन्ही शहरांची तुलना केली तर, मुंबईतली परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. 

मुंबईतली परिस्थिती चिंताजनक

जून आणि जुलै महिन्यातील दिल्ली आणि मुंबईची तुलना करता दिल्लीत 27 जून ते 10 जुलै 21387 नमुन्यांची आणि  मुंबईत 29 जून ते  19 जुलै  6,936 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. दिल्लीपेक्षा मुंबईतील नमुने कमी असले तरी दिल्लीत 23.5% लोकांमध्ये अँटिबॉडीज सापडल्यात.  मुंबईत झोपडपट्टी परिसरात तब्बल 57.8% आणि झोपडपट्टी नसलेल्या भागात 17.4% लोकांमध्ये अँटिबॉडीज आढळल्यात. या आकड्यांवरून दिल्लीपेक्षा मुंबईची परिस्थिती खूप भीषण असल्याचं चित्र समोर आलं आहे. 

पहिल्या सेरो सर्व्हेमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच तब्बल 64 लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. 11 मे ते 4 जून दरम्यान पहिले सेरो सर्वेक्षण करण्यात आले होते. पहिलं सर्वेक्षण 21 राज्यांमधील 70 जिल्ह्यांमध्येही करण्यात आला. त्यावेळी संसर्गाचे प्रमाण 0.73 टक्के असल्याचे दिसून आलं होतं. तसंच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं एकही प्रकरण समोर आलं नाही. त्या जिल्ह्यांमधील लोकांना कोरोना होऊन गेल्याचं समजलं. 

आता दुसऱ्या सेरो सर्व्हेमध्ये  ग्रामीण भागापेक्षाही शहरी भागातील झोपडपट्टी परिसरात सर्वात जास्त लोकांमध्ये अँटिबॉडी सापडल्या आहेत. झोपडपट्टी परिसरात 10 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या प्रत्येकी पंधरावा व्यक्तीनं कोरोनाचा सामना केला आहे.

ICMR second survey Mumbai showed the highest sero prevalence


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICMR second survey Mumbai showed the highest sero prevalence