महोत्सवातून गुणकारी रानभाज्यांची ओळख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

पालघरमध्ये औषधी गुणधर्म, पौष्टिकतेबाबत सविस्तर माहिती 

पालघर ः विक्रमगड, जव्हार, मोखाडा हा भाग कुपोषणग्रस्त म्हणून ओळखला जातो; मात्र या सर्व भागात रानभाज्या मोठ्या प्रमाणात असतात. या रानभाज्या आरोग्यास हितकारक असून त्यांचे औषधी गुणधर्म, त्यांचा उपयोग आणि त्यांचा परिचय करून देण्यासाठी भरवण्यात आलेल्या महोत्सवास नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. यातून गुणकारी रानभाज्यांची नव्याने ओळख झालीच; मात्र त्यांचे फायदेही नागरिकांसमोर आले. 

रानभाज्यांना बाजारपेठ मिळणे आवश्‍यक असून त्यासाठी शहरी लोकांना या रानभाज्यांचा परिचय करून देण्यासाठी, आदिवासींनी रोजगार निर्माण करून देण्यासाठी पालघरमधील जीवन विकास शिक्षण संस्था आणि सुंदरम एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे सोमवारी रानभाजी परिचय महोत्सव भरवण्यात आला.

स. तू. कदम विद्यालयातील अण्णासाहेब सावंत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कार्याध्यक्ष वाघेश कदम होते. सामाजिक कार्यकर्ते आणि रानभाज्यांचा परिचय असलेले किरण लेले यांनी या महोत्सवात रानभाज्यांची विशेष माहिती, त्यांचे औषधी उपयोग आणि पौष्टिकता, त्यांचे संवर्धन याविषयी सविस्तर माहिती दिली, तर कऱ्हेचे माजी सरपंच जगन्नाथ फिलीम यांनी स्टॉलवरील रानभाज्यांची ओळख करून दिली.

या वेळी परिसरातील विविध रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला पालघरमधील अनेक मान्यवरांनी भेट देऊन शंकाचे निरसन करून घेतले. गणेश प्रधान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर उपमुख्याध्यापक अजय राऊत यांनी आभार मानले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Identifying quality vegetables from the festival at Palghar