नावीन्यपूर्ण उपक्रमातून शिक्षकांना ओळखपत्र

प्रमाेद जाधव : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी भारत सरकारने कार्यक्षमता प्रतवारी दर्शकेची रचना केली आहे

अलिबाग : शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी भारत सरकारने कार्यक्षमता प्रतवारी दर्शकेची रचना केली आहे. प्रत्येक स्तरावर शालेय शिक्षण प्रणाली मजबूत करण्यासाठी; तसेच कार्यक्षमता प्रतवारी दर्शकांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्राथमिक शासकीय व अनुदानित शाळांमधील सर्व शिक्षकांना नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील ९ हजार ७४८ शिक्षकांना ओळखपत्र दिले जाणार असून, त्यासाठी चार लाख ८७ हजार ४०० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यू-डायस २०१७-२०१८ नुसार प्रत्येक ओळखपत्राला ५० रुपये खर्च केला जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

शिक्षकांना पूर्वी गट शिक्षणाधिकारी, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीचे ओळखपत्र दिले जात होते. प्रत्येक ओळखपत्रामध्ये बदल असल्याने एकसूत्रपणा नव्हता. त्यामुळे सरकारने समग्र शिक्षा अभियानाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत २०१९-२०२० या उपक्रमांतर्गत यू-डायस २०१७-२०१८ नुसार, जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शासकीय व अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी ओळखपत्र दिले जाणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून करण्यात आली असून, त्याचा आढावा तालुका स्तरावर मागवून आराखडाही तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना तालुका स्तरावर ओळखपत्र देण्याचे काम केले जाणार असून, त्यांच्याकडून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी ओळखपत्र मंजूर नाही.

रूपरेषा
ओळखपत्राचा आकार ८.५ से.मी. लांबी व ५.५ से. मी रुंद असणार आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना याच आकाराचे ओळखपत्र दिले जाणार आहे. या ओळखपत्रामध्ये सविस्तर व वस्तुनिष्ठ लेखाजोखा असणार आहे. ओळखपत्र छपाई व वितरण २०१९ - २०२० याच आर्थिक वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. 

ओळखपत्रावर दृष्टिक्षेप
तालुके     शिक्षक    वर्ग करण्यात येणारी रक्कम
अलिबाग    ७६७    ३८३५०
कर्जत    ९४६    ४७३००
खालापूर    ६७५    ३३७५०
महाड    ९९८    ४९९००
माणगाव    ८८६    ४४३००
म्हसळा    ३०५    १५२५०
मुरूड    २९९    १४९५०
पनवेल    १६३८    ८१९००
पेण    ७५९    ३७९५०
पोलादपूर    ३३४    १६७००
रोहा    ७२१    ३६०५०
सुधागड    ४३०    २१५००
श्रीवर्धन    ३३६    १६८००
तळा    २७४    १३७००
उरण    ३८०    १९०००

एकूण    ९७४८    ४८७४००


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Identity Card for Teacher