मोबाईल चोरी झाल्यास, सरकार करणार मदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा देण्यासाठी एक नवीन वेब पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलच्या मदतीने नागरिकांना आपला चोरी झालेला अथवा हरवलेला मोबाईल सहजपणे शोधता येणार आहे.

मुंबई : केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा देण्यासाठी एक नवीन वेब पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलच्या मदतीने नागरिकांना आपला चोरी झालेला अथवा हरवलेला मोबाईल सहजपणे शोधता येणार आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते या वेब पोर्टलचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.

सरकारने मोबाईल वापरकर्त्यांच्या या सेवेला सेंट्रल इक्युपमेंट आईडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) असे नाव दिले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून मोबाईलशी जोडलेल्या अन्य नेटवर्कला डिस्कनेक्ट करता येणार आहेत. याशिवाय या पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल चोरी करणाऱ्याचे स्थान ओळखता येणार आहे. 

हे करू शकाल!
या वेब पोर्टलच्या साहाय्याने नागरिक आपला मोबाईल ब्लॉक, चोरी किंवा हरवला असल्यास त्याचा शोध, मोबाईलचे स्थान ओळखू शकणार आहे. याशिवाय नागरिकांना आपल्या मोबाईलची ओळख असलेला आयएमईआय नंबरही संरक्षित ठेवता येणार आहे. मोबाईल चोरी झाल्यास या सेवेमुळे चोर आयएमईआय नंबरमध्ये कोणताही बदल करू शकणार नाही.

अशी करा तक्रार दाखल
जर तुमचा मोबाईल चोरी झाला असेल तर तुम्हाला सर्वप्रथम जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी लागेल. यानंतर केंद्रीय दूरसंचार मदत केंद्राच्या १४४२ या नंबरवर तुमचा मोबाईल चोरी झाल्याची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुमचा मोबाईल ब्लॉक करण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, ब्लॉक झालेल्या या मोबाईलमध्ये अन्य सिमकार्डचा वापर करण्यात आला. तर दूरसंचार कंपनीकडून त्याची माहिती पोलिसांना दिली जाईल. 

सध्यस्थितीत ही सेवा सरकारने महाराष्ट्रात सुरु केली असून, लवकरच या सेवेचा विस्तार अन्य राज्यांमध्येही केला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If mobile is stolen, the government will help