esakal | तुमच्या घरासमोर अचानक वाघ, सिंह अवतरला तर?
sakal

बोलून बातमी शोधा

हाेळी निमित्त काढलेली पालखी

तुमच्या घरासमोर सकाळीच वाघ, सिंह अवतरला तर? तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. सध्या असेच धक्के दक्षिण रायगडमधील रहिवाशांना बसत आहेत.

तुमच्या घरासमोर अचानक वाघ, सिंह अवतरला तर?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पोलादपूर : तुमच्या घरासमोर सकाळीच वाघ, सिंह अवतरला तर? तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. सध्या असेच धक्के दक्षिण रायगडमधील रहिवाशांना बसत आहेत. पण, हे प्राणी खरेखुरे नाहीत. तर ही आहेत, होळीची सोंगे! ढोल-नगाऱ्यांचा निनाद, वेगवेगळ्या प्रकारची सोंगे, दररोज पेटणारी होळी अशी उत्साही धूम सध्या दक्षिण रायगडमध्ये दिसत आहे. निमित्त आहे शिमगोत्सवाचे. डोंगरदऱ्यांनी व्यापलेल्या या भागातील बहुसंख्य रहिवासी नोकरी, रोजगाराच्या निमित्ताने मुंबई, ठाण्यासह अनेक लहान-मोठ्या शहरात स्थायिक झाले आहेत. परंतु ते या उत्सवाच्या निमित्ताने गावांमध्ये येऊ लागले असल्याने परिसराला जणू चैत्र पालवी 
फुटली आहे. 
दक्षिण रायगडमधील पोलादपूर तालुक्‍यात शिमगोत्सवाचे उत्साही वातावरण शुक्रवारपासून निर्माण झाले आहे. या दिवशी पहिली होळी लावण्यात आली. याच दिवसापासून चाकरमनी गावात येऊ लागले आहेत. उत्सवाच्या काळात देव-देवतांच्या पालख्या गावा-गावात नाचविण्यात येतात. रंगपंचमीपर्यंत ही धूम 
राहणार आहे. 
फाल्गुन महिन्यात येणारा शिमगोत्सव हा शेतकऱ्यांसाठी निवांत काळ असतो. त्यामुळे ते मोठ्या संख्येने सहभागी होतात. फाल्गुन शुक्‍ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात. नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात. काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला होळी साजरी होते. याला ‘होम’ लागणे असे म्हणतात. काही गावात होम झाल्यानंतरही गावात पालख्या फिरवण्याची प्रथा 
आजही आहे.
ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावायचा मान असतो. हा होम झाल्यावर त्यातील निखारा किंवा राख घेऊन जातात. त्यावर गावातील ठिकठिकाणी होळी पेटवतात, अशी प्रथा आजही आहे. पहिली होळी लावण्यात आली, त्यावेळी बच्चेकंपनीने ढोल-नगारे वाजविण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे होळीसाठी लाकडे मागण्यासाठी ठिकठिकाणी ते येऊ लागले आहेत. 
नृत्याचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील अविभाज्य भाग. वेगवेगळी सोंगे धारण करून हे कलाकार लोकांचे मनोरंजन करत आहेत. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, जाखडी नृत्य, पुरुषमंडळीनी स्त्री-वेश धारण करून केलेला तमाशा आणि त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यासारखी सोंगे असे विविध प्रकार यादरम्यान सादर करण्यात येत आहेत.
समृद्ध वारसा पुढे...
दक्षिण रायगडमध्ये पालखीला ‘सान’ म्हणतात. यानिमित्ताने गावजेवण होते; त्याला ‘भंग’ म्हणतात. पालखीतून येणाऱ्या स्त्री-देवतांची ओटी भरणे हा महिलांचा आस्थेचा विषय असतो. पालख्या गावा-गावातून फिरतात, त्यावेळी त्यांच्यासोबत असतो त्या गावातील लोककलाकारांचा संच. आपापल्या स्थानिक परंपरा सांभाळण्याचा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनेक दशके चालत आलेला आहे.
शिमगोत्सव हा सण पोलादपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने शहरात स्तलांतरित झालेले रहिवासी गावात हमखास येतात. त्यामुळे गावाला खऱ्या अर्थाने गावपण येते.
- निवेदन दरेकर, नोकरदार

loading image