आरोग्य सेवेकडे कानाडोळा

अर्चना राणे-बागवान  
शनिवार, 1 डिसेंबर 2018

नवी मुंबई - झपाट्याने विकसित होत असलेल्या उलवे नोडची लोकसंख्या सुमारे दीड लाख आहे. लोकल सेवा सुरू झाल्याने त्यामध्ये वेगाने वाढ होत असली तरी सिडकोच्या केवळ एकच नागरी आरोग्य केंद्रावर एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा भार आहे. हे केंद्रही बुधवार आणि गुरुवार सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत सुरू असते.

नवी मुंबई - झपाट्याने विकसित होत असलेल्या उलवे नोडची लोकसंख्या सुमारे दीड लाख आहे. लोकल सेवा सुरू झाल्याने त्यामध्ये वेगाने वाढ होत असली तरी सिडकोच्या केवळ एकच नागरी आरोग्य केंद्रावर एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा भार आहे. हे केंद्रही बुधवार आणि गुरुवार सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत सुरू असते.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

उलव्यात नवीन इमारतींची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे हिवताप, डेंगीसारख्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे; परंतु आरोग्य सेवेच्या नावाने ठणठणाट आहे. सेक्‍टर १९ येथील सिडकोच्या एकाच आरोग्य केंद्रावर तब्बल दीड लाख लोकसंख्येचा भार आहे. तसेच प्रसूतिगृहही नाही. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी नेरूळ किंवा बेलापूर गाठावे लागते.

खासगी दवाखान्यात उपचार परवडण्यासारखे नाहीत. त्यामुळे सिडकोच्या नागरी आरोग्य केंद्रात डॉक्‍टर उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. हे केंद्र दररोज सुरू असणेही आवश्‍यक आहे, असे रहिवासी नीलेश कदम यांनी सांगितले. दुसरीकडे सिडकोचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बाविस्कर यांनी हे केंद्र दररोज सुरू असते, असा दावा केला आहे. 

पाणीप्रश्‍न बिकट
उलव्यातील सेक्‍टर पाचमधील काही इमारतींना टॅंकरने होणारा पाणीपुरवठा दूषित आहे, असा आरोप होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना आरोग्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. अनेक इमारतींना दिवसातून एक-दोन तासच पाणी येते. त्यामुळे घरात असतील नसतील ती सर्व भांडी भरून ठेवावी लागत असल्याचे योगिता नायर या गृहिणीने सांगितले. यासंदर्भात सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे सहायक अभियंता ए. बी. नलावडे यांनी सांगितले की, ज्या इमारतींना परवानगी मिळाली नाही, अशा इमारतींना सिडको पाणीपुरवठा करत नाही. काही इमारतींना विकसक किंवा सोसायटी स्वतः टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करते. टॅंकरद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असेल तर त्याला विकसक, सोसायटी जबाबदार आहे.

उद्याने, समाजमंदिरांची प्रतीक्षा
सिडकोने उलव्यात उद्यानांचे भूखंड विकसित केले नाहीत. त्यामुळे लहान मुलांना इमारतींच्या आवारातच खेळावे लागते. सिडकोने विकसित केलेले सेक्‍टर दोन येथे एकच उद्यान आहे. सेक्‍टर नऊ येथे उद्यानाचे काम सुरू करण्यात आले आहे; मात्र ते अजूनही प्राथमिक स्थितीत आहे. तेथे टेकडी फोडण्याचे काम सुरू आहे. याबाबत सिडकोचे कार्यकारी अभियंता एस. के. ठक्कर यांनी सांगितले की, सेक्‍टर १६ मध्ये समाजमंदिर आणि सेक्‍टर १९ मध्ये भूमिपुत्र भवन होत आहे. सेक्‍टर दोनमधील उद्यान खुले केले आहे; मात्र अजूनही काही कामे अपूर्ण आहेत. सेक्‍टर तीन आणि १९ मध्ये लवकरच उद्याने विकसित होणार आहेत. 

वहाळ येथे रुग्णालयाची इमारत उभी राहिली आहे. लवकरच ते अद्ययावत सुविधांनी सज्ज होईल. तसा प्रस्ताव सरकारकडे दिला आहे. शिवाय नागरी आरोग्य केंद्रात कर्मचारी संख्या वाढवण्यास सुरुवात केली आहे.
- डॉ. बी. एस. बाविस्कर, मुख्य आरोग्य अधिकारी, सिडको

स्मशानभूमीची कमतरता
उलव्यात स्मशानभूमी नसल्याने रहिवाशांची धावपळ होते. गावातील एकमेव स्मशानभूमीत अंत्यसंस्कारास विरोध होतो. गाववाले विरुद्ध बाहेरचे असा संघर्ष होत असल्याचे येथील एका रहिवाशाने सांगितले. त्यामुळे येथे सिडकोने स्मशानभूमी बांधावी, अशी मागणी रहिवासी करत आहेत.

Web Title: Ignore the health service