Thane Encroachment : अनाधिकृत बांधकामांवरील कारवाईला महिलांचा विरोध; पालिकेने दिली दोन दिवसांची मुदत

गेल्या काही दिवसांपासुन ठाणे पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेने कारवाईचा फास आवळला आहे.
thane
thanesakal

ठाणे - गेल्या काही दिवसांपासुन ठाणे पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेने कारवाईचा फास आवळला आहे. कळवा, दिवा पाठोपाठ माजीवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उभारण्यात आलेल्या आठ मजली इमारतीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या पथकाला नागरिकांनी विरोध केला.

तर, येथील महिला पथकावर धावून गेल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या रहिवाशांना दोन दिवसांची मुदत पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. यावेळी काही रहिवाशांनी इमारत उभी राहत असतांना पालिका प्रशासन झोपले होते का? असा संतप्त सवाल देखील उपस्थित केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ठाणे पालिका क्षेत्रातील कळवा, दिवा पाठोपाठ माजीवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे.

पालिका हद्दीत मानपाडा माजिवडा प्रभाग समितीअंतर्गत बाळकूम पाडा १ दादलानी रोड येथे जय गजानन हाईटस ही तळ अधिक आठ मजली इमारत आहे. येथे सध्या तीस कुटुंबीय राहतात. ही इमारत अनधिकृत असल्याने त्यावर कारवाई करण्यासाठी सोमवारी सकाळी महापालिकेचे पथक दाखल झाले होते. मात्र या कारवाईला येथील रहिवाशांनी तीव्र विरोध केला.

महिला रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. तसेच पालिकेच्या पथकाबरोबर बाचाबाची देखील झाली. उपायुक्त गजानन गोदेपुरे आणि सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही त्यांचा विरोध कायम होता. अखेर पोलिसांना पाचरण करावे, तरी देखील महिला आक्रमक असल्याचे दिसून आले. ही इमारत उभी राहत असताना तेथील काम का रोखले नाही? असा सवाल येथील रहिवाशांनी उपस्थितीत केला.

प्रत्यक्षदर्शिनींनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी काही महिलांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतण्याचा प्रयत्न करून कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा ताफा महापालिका कर्मचारी यांना रोखले. अखेर येथील रहिवाशांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर इमारतीवर कारवाई केली जाईल असे पालिकेने स्पष्ट केले.

यापूर्वी सहा वेळा कारवाई

तळ अधिक आठ मजल्यांच्या या इमारतीवर यापूर्वी देखील वारंवार कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली चार वेळा आणि उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेळा कारवाई करण्यात येऊनही येथे इमारत उभी राहिल्याचे दिसून आले. तर मागील तीन दिवसात माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत १७ फ्लॅटवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com