शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासावर परिणाम; परवानगीअभावी मुंबईत विद्यार्थी-शिक्षकांमध्ये नाराजी 

तेजस वाघमारे
Saturday, 16 January 2021

मुंबई महानगरपालिकेने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी न दिल्याने विद्यार्थी, शिक्षकांमध्ये नाराजी आहे. बोर्डाच्या परीक्षा तोंडावर आल्या असतानाही मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा विद्यार्थ्यांसाठी बंदच ठेवल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर पाणी पडले आहे.

मुंबई  : मुंबई महानगरपालिकेने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी न दिल्याने विद्यार्थी, शिक्षकांमध्ये नाराजी आहे. बोर्डाच्या परीक्षा तोंडावर आल्या असतानाही मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा विद्यार्थ्यांसाठी बंदच ठेवल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर पाणी पडले आहे. परीक्षेत लिहिण्याचा सराव, विज्ञान विषयांचा सराव, तोंडी परीक्षा, श्रेणी विषयांचे मूल्यमापन कसे करणार, असा प्रश्‍न शाळांसमोर निर्माण झाला आहे. 

राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. 23 नोव्हेंबरपासून मुंबई वगळता अन्य जिल्ह्यांत नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत; मात्र मुंबईत शाळा सुरू नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे प्रचंड नुकसान होत आहे. प्रिलियम परीक्षेत वेळेत पेपर सोडविण्याचा सराव व्हावा, विज्ञान विषयाचा सराव करता यावा तसेच तोंडी परीक्षा आणि श्रेणी विषयांचे मूल्यमापन करण्यासाठी तरी मुंबईतील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे, अशी मागणी टीचर्स डोमोक्रॅटिक फ्रंटचे राजेश पांड्या यांनी केली आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय योग्यच आहे. आठवीपर्यंत नापास न करण्याच्या धोरणामुळे या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन मूल्यमापन करून त्यांना वरच्या वर्गात पाठवणे शक्‍य आहे; मात्र नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतल्याशिवाय त्यांचे मूल्यमापन अशक्‍य असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. 

...तर मुंबईत शिक्षकांची 50 टक्के उपस्थिती का? 
मुंबईतील शाळेत एकाही विद्यार्थ्याला न बोलावता "वर्क फ्रॉम होम'नुसार ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, तर शिक्षकांची शाळेत 50 टक्के उपस्थिती कशासाठी, असा सवाल करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद असताना शिक्षकांना शाळेत बोलावून अशैक्षणिक कामे लावू नयेत, असेही पांड्या यांनी स्पष्ट केले. 

Impact on students studies due to school closure in Mumbai due

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Impact on students studies due to school closure in Mumbai due