'माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम गावांमध्ये प्रभावी राबवा! ग्रामविकास मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

सकाळ न्यूज नेटवर्क 
Thursday, 10 September 2020

कोव्हिड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे

मुंबई : कोव्हिड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमार्फत राज्यात ग्रामीण भागात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आज दिल्या आहेत. 

मुंबई विद्यापीठाकडून अंतिम वर्षाचे वेळापत्रक जाहीर; 1 ते 17 ऑक्टोबरदरम्यान परीक्षा; जाणून घ्या परीक्षेचे स्वरूप

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याला अटकाव घालण्यासाठी ग्रामविकास विभागाची सर्व यंत्रणा संपूर्ण कोरोना संकटकाळात मोठ्या निर्धाराने काम करीत आहे. यापुढील काळातही या कोरोना योद्ध्यांनी या मोहीमेत योगदान देऊन कोरोनावर मात करावी, असे आवाहन त्यांनी केले.  मुश्रीफ यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंधरावा वित्त आयोग, उमेद अभियान यांसह ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, उपसचिव तथा उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण जैन आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

कंगनाच्या बंगल्यावरील कारवाई सुडबुद्धीने! आशिष शेलार यांची पालिका, राज्य सरकारवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ही मोहीम जाहीर केली आहे. या जनजागृती मोहिमेत लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत पदाधिकारी, गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांना सहभागी करुन त्यांचे सहकार्य घ्यावे, असे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

घरोघरी जात जनजागृती
राज्यात मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्यविषयक चौकशी व जनजागृती केली जाणार आहे. यात दोन कर्मचाऱ्यांचे, स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात 50 घरांना भेटी देईल. पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी, आशा वर्कर आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Implement My Family, My Responsibility campaign in villages effectively! Notice to the officers of the Minister of Rural Development