सेरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या फेरीमधील मुंबईतील महत्वाची निरीक्षणे

मिलिंद तांबे
Friday, 2 October 2020

इमारतींमध्ये कोविडचा संसर्ग वाढला असून झोपडपट्ट्यांमधील कोविडचा संसर्ग कमी होत आहे असा निष्कर्ष सेरोलॉजी सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्पात काढण्यात आला आहे. शिवाय पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कोविडची बाधा किंचितशी वाढत असल्याचे आढळले आहे. 

मुंबई: इमारतींमध्ये कोविडचा संसर्ग वाढला असून झोपडपट्ट्यांमधील कोविडचा संसर्ग कमी होत आहे असा निष्कर्ष सेरोलॉजी सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्पात काढण्यात आला आहे. शिवाय पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कोविडची बाधा किंचितशी वाढत असल्याचे आढळले आहे. 

झोपडपट्टी परिसरातील नमुन्यांमध्ये आढळून आलेले ऍन्टी बॉडीजचे प्रमाण तसेच बाधित रुग्ण संख्येचा अभ्यास केला असता  झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 45 टक्के आणि इमारत परिसरात सुमारे 18 टक्के याप्रमाणे रक्तातील ऍन्टीबॉडीजचे प्रमाण आढळून आले आहे. त्यामुळे इमारत परिसरात संसर्गामध्ये काही अंशी वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे.

पहिल्या फेरीमध्ये अंदाजित केलेल्या 8 हजार 870 पैकी एकूण 6 हजार 936 नमुने संकलित करण्यात आले होते. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर या 3 विभागांतून हे नमुने संकलित करण्यात आले होते.

सर्वेक्षणाच्या दुसऱ्या फेरी अंतर्गत आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर याच तीन विभागात सदर सर्व्हे सप्टेंबर अखेरीस करण्यात आला. या दुसऱ्या फेरी अंतर्गत अंदाजित केलेल्यात 5 हजार 840 एवढया लक्ष्य नमुन्यांपैकी 5 हजार 384 नमूने संकलित करण्यात आले. हे नमूने संकलित करण्यासाठी 728 व्यक्ती कार्यरत होत्या.

दुसऱ्या फेरीतील सर्वेक्षणामध्ये लक्षणे असलेल्या, बरे झालेल्या किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींचा समावेश होता. तसेच संस्थात्माक विलगीकरणात असलेल्या आणि सक्रीय प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यक्तींना या अभ्यासातून वगळण्यात आले. एकूण नमून्यांपैकी साधारणपणे एक ते दोन टक्के नमूने हे गेल्या फेरीत सहभागी झालेल्या व्यक्तीचेही होते. 

सर्वेक्षणाच्या  दुस-या फेरीमधील महत्वाची निरीक्षणे

झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 45 टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे 18 टक्के याप्रमाणे रक्तातील प्रतिद्रव्याचे (ऍन्टीनबॉडीज) प्राबल्य आढळून आले आहे. 
ऍन्टीबॉडीज प्राबल्य हे पुरुषांच्या  तुलनेत महिलांमध्ये किंचितसे अधिक आढळून आले आहे. मात्र, पहिल्या फेरी दरम्यान तीनही विभागांतील लोकसंख्येमध्ये सर्व वयोगटांमध्ये समान प्राबल्य असल्याचे आढळले होते, तर दुस-या फेरी दरम्यान हे प्राबल्य 40 पेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींमध्ये काही प्रमाणात अधिक असल्याचे आढळून आले आहे.
आरोग्य क्षेत्रात काम करणाऱया व्यक्तिंमध्ये सरासरी 27 टक्के एवढे ऍन्टीबॉडीज प्राबल्य आढळून आले आहे. या अंतर्गत हेल्थ पोस्ट, दवाखाने, आरोग्य कार्यालय आणि क्षेत्रस्तरावर  काम करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे. 

झोपडपट्टी परिसरातील आढळून आलेल्या ऍन्टीबॉडीज प्राबल्याच्या टक्केवारीच्या तुलनेत त्याच परिसरातील काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये ऍन्टीबॉडीजचे प्राबल्य तुलनेने कमी असल्याचे आढळून आलेले आहे. आरोग्य कर्मचा-यांद्वारे मास्कचा करण्यात येत असलेल्या सुयोग्य वापर आणि हातांची करण्यात येत असलेली नियमित स्वच्छ्ता यामुळे हे शक्य झाले असावे.

बरे झालेले रुग्ण / लक्षणे नसलेले रुग्ण यांच्यामध्ये काही कालावधीनंतर ऍन्टीबॉडीज पातळी ही घसरते; मात्र याचा प्रतिकार शक्तीवर काही परिणाम होतो का हे अद्याप कळू शकलेले नाही.

या उपक्रमात नीती आयोग, मुंबई महापालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरित्या राबविण्यात येत आहे. यासह कस्तुरबा रेणूजीवशास्त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रांसलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान, ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट हे देखील त्यामध्ये सहयोगी संस्था म्हणून सहभागी आहेत.

---------------

(संपादनः पूजा विचारे) 

Important observations in Mumbai in the second round of sero survey


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important observations in Mumbai in the second round of sero survey