परवानगी नसताना 'क्लीनअप मार्शल'ची प्रवाशांकडून दंडवसूली; कल्याण स्थानक परिसरातील धक्कादायक प्रकार

सुचिता करमारकर
Sunday, 27 September 2020

रेल्वे स्थानक परिसरात साफसफाईसाठी नेमण्यात आलेल्या 'क्लीन-अप मार्शल'ने नागरिकांकडून दंड वसूल केल्याची बाब समोर आली आहे.

 

कल्याण : कोरोना काळात तोंडावर मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध कल्याण-डोंबिवली महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. याचाच फायदा उचलत रेल्वे स्थानक परिसरात साफसफाईसाठी नेमण्यात आलेल्या 'क्लीन-अप मार्शल'ने नागरिकांकडून दंड वसूल केल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दिलीप गायकवाड या क्लीन अप मार्शलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या तीन साथीदारांनी तेथून पलायन केले, मात्र त्यांचाही शोध सुरू आहे. 

खासगी जमिनींवरील वनसंज्ञेविरोधात शेतकरी एकवटले; शेरा काढण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा देण्यास सुरुवात

क्लीन-अप मार्शल मास्क न घातलेल्या नागरिकांकडून दंड वसूल करत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या होत्या. पालिका प्रशासनाने क्लीन-अप मार्शलना अशा प्रकारच्या दंड वसुलीचे अधिकार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानक परिसरात पाहणी केली असता क्लीन-अप मार्शल दंड वसूल करताना आढळले. त्यांना ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हा प्रकार घडला त्यावेळी गायकवाड याच्यासोबत अन्य तीन साथीदार होते. मात्र त्यांनी तेथून पळ काढला. सिद्धार्थ दळवी, आकाश शेरे, अशोक रणपीसे अशी त्यांची नावे आहेत. एका खासगी ठेकेदाराकडून या क्लीन-अप मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे. या ठेकेदाराविरोधात महापालिका कारवाई करणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imposition of cleanup marshal on passengers without permission