'महाराष्ट्राच्या संस्कृतीला बीडच्या घटनेने काळिमा, महिला सुरक्षेसाठी कृती आरखडा हवा' - प्रवीण दरेकर

कृष्ण जोशी
Monday, 16 November 2020

बीडमध्ये तरुणीला अॅसीड-पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याची घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी आहे.

मुंबई ः बीडमध्ये तरुणीला अॅसीड-पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याची घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी आहे. ठाकरे सरकारच्या काळात महिला सुरक्षित नसल्याने महिला सुरक्षेसाठी तात्काळ कृती आराखडा बनविण्याची आवश्यकता आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे केली.

हेही वाचा - घाटकोपर येथील नाल्यात पडून महिलेचा मृत्यू प्रकरणी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

प्रत्येक आठवड्याला महिलांचा विनयभंग, बलात्कार अत्याचाराच्या घटना घडत आहेत. तरीही शासन अजून गंभीर नाही, हे राज्य सरकारला लांच्छनास्पद आहे अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे.

ऐन दिवाळीत बीडमधील या 22 वर्षीय तरुणीला ठार मारण्यात आले, हाथरसच्या नावाने गळा काढणाऱ्यांचा गळा आता कोणी धरला आहे? कोणत्याही विषयाचे राजकारण करू नका असे म्हणणाऱ्या या निगरगट्ट सरकारला कधी जाग येणार? या राज्यात महिला सुरक्षित आहेत का, असे प्रश्नही दरेकर यांनी उपस्थित केले आहेत.
  
हेही वाचा - 8 महिन्यांनंतर उघडली मंदिरांची दारं, भाजप नेत्यांकडून श्रेयवादाची लढाई

मंदिराशेजारील स्टॉलना अर्थसाह्य

भारतीय जनता पार्टीच्या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त करतानाच मंदिर परिसरातील छोटया व्यायसायिकांना तातडीची मदत म्हणून बिनव्याजी कर्ज द्यावे, अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे. या व्यावसायिकांना 10 हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत कर्ज, द्यावे असेही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे कळविले आहे.  

मार्च महिन्यापासून मंदिरे बंद असल्यामुळे मंदिरांच्या आवारातील अनेक छोटया व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. या व्यावसायिकांमध्ये फूल विक्रेते, हार विक्रेते, प्रसाद विक्रेते अशा छोट्या व्यावसायिकांचा समावेश आहे. आता मंदिरे सुरू झाल्यानंतर त्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवलाची चणचण भासत आहे. त्यामुळे सरकारने छोट्या व्यावसायिकांना तातडीने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन द्यावे. कर्जाची परतफेड छोटे व्यावसायिक नियमितपणे करतील. शासनाने याकरिता बॅकांना कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना द्याव्यात व व्याजाची रक्कम शासनाने भरावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे.

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The incident in Beed is very bad said Praveen Darekar