कल्याणमध्ये तापरुग्णांच्या संख्येत वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

गॅस्ट्रो १४१, कावीळ १३७, टायफॉईड ३५०, लेप्टोस्पायरोसीस ३, मलेरिया १०८, संशयित डेंगी १५४, यातील संशयित १ रुग्णाचा डेंगीने मृत्यू झाला आहे. तापरुग्ण ११ हजार १५० रुग्ण, स्वाईन फ्लू ३७ रुग्ण. संशयित स्वाईन फ्लूच्या ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारी पाहता तापरुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरी, ग्रामीण भागात पूरपरिस्थिती पूर्वपदावर येत असताना बदलत्या हवामानामुळे साथीचे आजार फैलावत आहेत. रुग्णालयांमध्ये रुगणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

२६ आणि २७ जुलै आणि ३ आणि ४ ऑगस्ट या दिवशी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पूर ओसरल्यानंतर बदलत्या हवामानामुळे अनेक नागरिकांना सर्दी, खोकला, शिंका, ताप आदी तक्रारी वाढल्या आहेत. टिटवाळा, कल्याण पूर्व व पश्‍चिममध्ये पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात आहे; नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू लवांगरे यांनी केले आहे.

१ जून ते १८ ऑगस्ट २०१९ पर्यंतची आकडेवारी
गॅस्ट्रो १४१, कावीळ १३७, टायफॉईड ३५०, लेप्टोस्पायरोसीस ३, मलेरिया १०८, संशयित डेंगी १५४, यातील संशयित १ रुग्णाचा डेंगीने मृत्यू झाला आहे. तापरुग्ण ११ हजार १५० रुग्ण, स्वाईन फ्लू ३७ रुग्ण. संशयित स्वाईन फ्लूच्या ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारी पाहता तापरुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

बदलत्या हवामानामुळे साथीच्या रोगाचे रुग्ण वाढत आहेत; मात्र परिस्थिती नियंत्रणात असून त्यावर उपाययोजना सुरू आहे. तसेच नागरिकांनीदेखील आरोग्याची काळजी घ्यावी.
- डॉ. राजू लवांगरे, पालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी

उल्हासनगरात मुलीला डेंगी
 मागील महिन्यात एका १८ वर्षीय तरुणाचा डेंगीने बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच खेमानी परिसरात राहणाऱ्या दृश्‍य चांदवानी या १२ वर्षीय मुलीला डेंगीची लागण झाली आहे. तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या वृत्ताला पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दुजोरा दिला आहे. शांतिनगरमध्ये राहणाऱ्या संदेश पाल या तरुणाचा डेंगीने मृत्यू झाला होता. आता खेमानी परिसरात डेंगीचा रुग्ण आढल्याने भीतीचे वातावरण आहे. शहरात डेंगीचे २५ संशयित व ५ लेप्टोस्पायरोसिस रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यात डेंगीचे दोन रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आले असून लेप्टोस्पायरोसिसचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याची माहिती डॉ.  रिजवानी यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in number of fever patients in Kalyan