सणासुदीत वाहनविक्रीत वाढ; पण पुढील चित्र अर्थव्यवस्थेवर अवलंबून 

सणासुदीत वाहनविक्रीत वाढ; पण पुढील चित्र अर्थव्यवस्थेवर अवलंबून 

मुंबई ः सप्टेंबरपासून सुरु झालेल्या सणासुदीच्या काळात देशात वाहनविक्री वाढल्याने सध्याचे चित्र चांगले आहे. मात्र पुढील काळात देशाची अर्थव्यवस्था कशी गती घेते यावरच वाहनविक्रीचा पुढचा वेग अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे. 

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या वाहनविक्रीच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. नोव्हेंबरपर्यंत कोरोनाचे सावट देशात असल्याने मागीलवर्षीच्या तुलनेत याच वर्षातील आठ महिन्यांच्या काळातील वाहनविक्री मंदावली असली तरी सणासुदीत त्यात चांगलीच वाढ झाली. केवळ तिचाकी रिक्षांच्या विक्रीत यंदा घट झाली आहे.

मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात सर्व प्रकारच्या वाहनांची मिळून एकत्रित विक्री 9.8 टक्के वाढली. मागील नोव्हेंबरमध्ये ही संख्या 17 लाख 19 हजार 874 होती, तर यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये हा आकडा 18 लाख 88 हजार 903 झाला. दुचाकी व प्रवासी गाड्यांना सणासुदीत मागणी आल्याने दुचाकींची विक्री 13.4 टक्के वाढून ती 16 लाख झाली. तर प्रवासी गाड्यांच्या विक्रीत 4.65 टक्के वाढ होऊन ती संख्या दोन लाख 64 हजार 898 एवढी झाली. 

प्रवासी वाहने, दुचाकी, तिचाकी रिक्षा आणि चारचाकी गाड्या यांची एकत्रित विक्री मागीलवर्षीच्या नोव्हेंबरमध्ये 17 लाख 19 हजार 874 एवढी होती. तर यावर्षी ती 18 लाख 88 हजार 903 एवढी वाढली. प्रवासी वाहनांपैकी मालवाहू वाहनांच्या गटात मागीलवर्षीच्या नोव्हेंबरमध्ये 88 हजार 361 वाहने विकली गेली तर यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये एक लाख 3 हजार 525 एवढी विक्री झाली. एकंदर सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनविक्रीमध्ये गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरपेक्षा यंदा 4.65 टक्के वाढ होऊन ही संख्या यंदा दोन लाख 64 हजार 898 अशी झाली. याच महिन्यात सर्व प्रकारच्या दुचाकींची विक्री तेरा टक्क्यांनी वाढून ती 16 लाखांवर गेली. त्यातील मोटरसायकलच्या विक्रीत 14.9 टक्के वाढ होऊन ती 8.93 लाखांवरून 10.26 लाखांवर गेली. 

मागचे वर्ष व हे वर्ष यातील एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांचा कालावधी विचारात घेतला तर यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने 26 टक्के विक्री घटली आहे. मागीलवर्षी या काळात सर्व वाहनांची एकत्रित विक्री एक कोटी 51 लाख होती तर ती यवर्षी एक कोटी 12 लाख झाली. दोनही वर्षांच्या नोव्हेंबर महिन्यातील रिक्षांची विक्री पाहिली तर त्यात 57 टक्के घट झाली. मागील वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये देशात 55 हजार 778 रिक्षा विकल्या  गेल्या, तर यावर्षी ही संख्या 23 हजार 626 झाली, असे सोसायटीचे महासंचालक राजेश मेनन यांनी सांगितले.

Increase in vehicle sales during festivals But the next market depends on the economy

---------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com