पोस्ट कोविडचा वाढता प्रभाव, ओपीडीत 1500 रूग्ण दाखल

भाग्यश्री भुवड
Thursday, 3 December 2020

मुंबई पालिकेच्या रुग्णालयांकडून आणि जंम्बो कोविड केअर केंद्राकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 1500 हून अधिक रुग्ण आरोग्याच्या समस्येसाठी ओपीडीत दाखल झाले आहेत.

मुंबई: कोरोनाचा संसर्ग झाल्यावर आणि बरे झाल्यानंतरही अनेक रुग्णांच्या आरोग्यावर पोस्ट-कोविड परिणाम झाले आहेत. मुंबई पालिकेच्या रुग्णालयांकडून आणि जंम्बो कोविड केअर केंद्राकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 1500 हून अधिक रुग्ण आरोग्याच्या समस्येसाठी ओपीडीत दाखल झाले आहेत. 

पालिकेनं पोस्ट कोविड उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेऊन रुग्णांसाठी मुंबईच्या रूग्णालयात आणि जंम्बो कोविड केअर केंद्रांमध्ये पोस्ट कोविड ओपीडी सुरू केली. काही विशेष ओपीडी एक ते दोन महिन्यांपूर्वी सुरू केल्या गेल्या आणि काही येत्या काही आठवड्यापासून विविध ठिकाणी सुरु केल्या गेल्या आहेत. डॉक्टरांच्या मते, कोविडला हरवल्यानंतरही बर्‍याच रुग्णांना शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी स्वतंत्र ओपीडी तयार केली गेली आहे जेणेकरून त्यांना कोणताही त्रास न होता त्वरित आरोग्य सेवा मिळू शकेल.

10 टक्क्यांमध्ये गंभीर समस्या

गेल्या दोन महिन्यांत कोविडच्या समस्येने ग्रस्त 500 हून अधिक पोस्ट रुग्ण रूग्णालयात उपचारासाठी आले आहेत. फायब्रोसिस, मूत्रपिंडाचा त्रास, अनियंत्रित मधुमेह यासारख्या गंभीर आरोग्याच्या समस्या सुमारे 10 टक्के रुग्णांमध्ये आढळल्या आहेत. 
डॉ. रमेश भारमल, संचालक पालिका प्रमुख रुग्णालय आणि अधिष्ठाता नायर रुग्णालय

ही एक सामान्य समस्या

ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या ओपीडीमध्ये आतापर्यंत 500 हून अधिक रुग्ण आले आहेत. श्वास घेण्यास अडचण, अशक्तपणा आणि निद्रानाश ही बर्‍याच लोकांमध्ये सामान्य आरोग्य समस्या आहेत. या सर्व समस्यांवर उपचार आहेत. म्हणून रुग्णांना घाबरून जाण्याची गरज नाही.
मोहन जोशी, अधिष्ठाता, सायन रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय

दोन महिन्यांत 500 प्रकरणे

आम्ही ऑक्टोबरमध्ये पोस्ट कोविड ओपीडी सुरू केली आहे. आतापर्यंत 500 हून अधिक रुग्ण ओपीडीमध्ये आलेत. यातील बर्‍याच रूग्णांमध्ये फुफ्फुसातील संक्रमण आणि मानसिक समस्या पाहिल्या आहेत. पण या गंभीर समस्या नाहीत. कारण, रुग्णांना शक्य तेवढे सर्व उपचार दिले जात आहेत आणि काही दिवसांनंतर आरोग्याच्या या तक्रारींमध्ये ही सुधारणा दिसून आल्या आहेत.
डॉ. राजेश डेरे,प्रमुख, बीकेसी जंम्बो कोविड केअर सेंटर

अधिक वाचा-  "ती नटी म्हणते ते POK आहे, आता योगीजी मुंबईत आले आहेत की पाकव्याप्त काश्मीरमध्ये ?"

नेस्कोमध्ये 5 रूग्ण

नेस्को जंम्बो कोविड केअर सेंटरचे अधीक्षक डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले की, सोमवारपासून आम्ही कोविड ओपीडी पोस्ट सुरू केली आहे. पहिल्या दिवशी 5 रुग्ण पोस्ट कोविड ओपीडीत आले आहेत. आमच्या इथे सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी आठवड्यातून 3 दिवस ओपीडी सुरू ठेवली आहे. गरज भासल्यास रुग्णांसाठी ईसीजी, लॅब टेस्ट आणि एक्स-रेची व्यवस्था करण्यात आली आहे. केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की, पोस्ट कोविड आरोग्याच्या समस्या असलेले आमच्याकडे फारसे रुग्ण नाहीत.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Increasing effect of post covid 1 thousand 500 patients admitted to OPD


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increasing effect of post covid 1 thousand 500 patients admitted to OPD