
INS Vikrant : स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत मुंबई दौऱ्यावर...
मुंबई : भारताने निर्माण केलेले एकमेव स्वदेशी विमानवाहू जहाज, आयएनएस विक्रांत आपल्या पहिल्या मुंबई भेटीवर आहे. आयएनएस विक्रांतने मुंबई बंदराला पहिली भेट देत भारताने आपल्या सागरी इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला आहे.
10 मार्च रोजी आयएनएस विक्रांतचे मुंबईत दिमाखात स्वागत करण्यात आले. भारतीय नौदलासाठी भारतात तयार करण्यात आलेल्या आयएनएस विक्रांत विमानवाहू युद्धनौका अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहेत.
विक्रांतची वैशिष्टे
आयएनएस विक्रांत 45000 टन वजनाचे असून 262 मीटर लांबीची युद्धनौका आहे. भारतात तयार करण्यात आलेली आतापर्यंतची सर्वात मोठी युद्धनौका आहे. विमानवाहू जहाजाच्या हँगरवर 18 मजले, 14 डेक आणि 2300 कंपार्टमेंट आहेत.
आयएनएस विक्रांतच्या विशेषतेमुळे याची ओळख तरंगते शहर म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. आयएनएस विक्रांतमध्ये कार्यरत 1500 कर्मचाऱ्याच्या वास्तव्याची सुविधा करण्यात आलेली आहे . विक्रांत युद्धनौका फायटर जेट विमान , हेलकॉप्टर वाहून नेऊ शकते. यात 30 मिग-29K विमाने, एमएच-60 रोमियो हेलिकॉप्टर, कामोव केए-31 हेलिकॉप्टर, लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट इतर हलकी हेलिकॉप्टर वाहून नेऊ शकते.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भेटीला
गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मुंबईत भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतला भेट दिली . यावेळी भारतीय नौदलाने अल्बानीज यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. इतकेच नाही तर अल्बानीज लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टच्या (एलसीए) कॉकपिटमध्येही बसले. उल्लेखनीय म्हणजे, आयएनएस विक्रांतला भेट देणारे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज हे पहिले परदेशी पंतप्रधान आहेत.