बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडितेला फोनवरून धमक्या...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 March 2020

 भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात बलात्कार आणि ॲट्रॉसिटी; तर त्यांचा समर्थक संजय थरथरे याच्याविरोधात धमकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, आता पीडित महिलेला धमक्‍यांचे फोन सुरू झाले आहेत.

मिरा रोड : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात बलात्कार आणि ॲट्रॉसिटी; तर त्यांचा समर्थक संजय थरथरे याच्याविरोधात धमकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, आता पीडित महिलेला धमक्‍यांचे फोन सुरू झाले आहेत. याबाबत संबंधित महिलेने मिरा रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे; तर दुसरीकडे अद्यापही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

भाजपच्या एका नगरसेविकेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पीडित महिलेस मेहतांचा समर्थक संजय थरथरे यांनी सतत धमकी दिली होती. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित महिलेस ५ ते ६ धमक्‍यांचे फोन आले आहेत.
२८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री मेहता आणि थरथरे दोघेही फरार झाले आहेत. याबाबतचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

ही बातमी वाचा ः सावधान ! कोरोना व्हायरसचा मुंबईत शिरकाव

त्यामध्ये मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस-वे जवळील एका हॉटेलात थांबल्याचे दिसत आहे. त्याच वेळी भाजप नगरसेवक प्रशांत दळवी यांच्या गाडीत दोघे आरोपी बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याप्रकरणी आता नगरसेवक प्रशांत दळवी वादात सापडले आहेत. पोलिसांनी दळवींचा जबाब नोंदवला आहे. दरम्यान, आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या दळवीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

पोलिसांवर कारवाईची मागणी
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता व त्यांचा सहकारी संजय थरथरे याला पळून जाण्यास काही पोलिस अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी केला आहे. पहाटे तीन वाजून ३५ मिनिटांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस किती वाजता आरोपींना शोधायला गेले त्याचा तपास करून त्यात दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुवर्णा यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Intimidating phone calls have been launched to the victim