
गुंतवणूकदार मालामाल; HDFC विलीनीकरणाने तेजी
मुंबई : एचडीएफसी व एचडीएफसी बँक यांच्या विलीनीकरणाच्या बातमीमुळे आज त्या दोन वित्तसंस्थांच्या शेअरचे भाव नऊ ते दहा टक्के वाढलेच पण त्यामुळे शेअरबाजारात उत्साह पसरून सेन्सेक्सने पुन्हा साठ हजारांचा, तर निफ्टीने १८ हजारांचा टप्पा पार केला. आज गुंतवणूकदारांच्या सर्व शेअरचे मूल्य चार लाख कोटी रुपयांनी वाढले.
विलीनीकरणाच्या बातमीमुळे आज सेन्सेक्स व निफ्टीही दोन टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. सेन्सेक्स १३३५.०५ अंश वाढून ६०,६११.७४ अंशांवर स्थिरावला तर निफ्टी ३८२.९५ अंश वाढून १८,०५३.४० अंशांवर बंद झाला. एचडीएफसी व एचडीएफसी बँक यांचे सेन्सेक्स व निफ्टीमधील वजन पाहता सेन्सेक्सच्या आजच्या १३३५ अंशांपैकी सुमारे ९३२ अंश (अंदाजे ७० टक्के) या दोन वित्तसंस्थांमुळेच वाढले.
बीएसईवर एचडीएफसी बँक ९.९७ टक्के म्हणजेच १५० रुपये वाढून १,६५६ रुपयांवर स्थिरावला. तर, एचडीएफसी ९.३० टक्के म्हणजे २२७ रुपयांनी वाढून २,६७८ रुपयांवर बंद झाला. आज एनएसई वर एचडीएफसीच्या तीन कोटी ४१ लाख शेअरचे व्यवहार झाले. त्यापैकी गुंतवणुकदारांनी ४५ टक्के म्हणजे एक कोटी ५४ लाख शेअर दिवसअखेरीस आपल्या डिमॅट खात्यात जमा करण्यासाठी खरेदी केले.
आज बाजारात काय घडले?
सेन्सेक्समधील कोटक, हिंदुस्थान युनिलिव्हर, सनफार्मा, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, टाटास्टील, एचसीएल टेक हे शेअरही दीड ते सव्वातीन टक्के वाढले.
आज बँकांसह, औषधनिर्मिती, धातू व एफएमसीजी कंपन्यांचे शेअर वाढले. बीएसई वरील सर्व शेअरचे भांडवली बाजारमूल्य सुमारे चार लाख कोटी रुपयांनी वाढले.
एचडीएफसी विलीनीकरण तसेच रशिया-युक्रेन युद्धबंदीबाबत सकारात्मक बातम्या आणि कच्च्या तेलाचे घटलेले भाव यामुळे आज बाजार तेजीत होते.
आठवड्याची सुरुवात दमदार
विलीनीकरणाच्या बातमीमुळे आज सकाळपासूनच दोन्ही शेअरबाजार तेजीतच होते, सेन्सेक्सने सकाळीच साठ हजारांचा टप्पा पार केला. त्यानंतर तो आज साठ हजारांच्या खाली गेलाच नाही. निफ्टीच्या वाढीतही आज या दोनही वित्तसंस्थांच्या शेअरचा वाटा ५७ टक्के होता. उरलेली ४३ टक्के वाढ इतर ४४ शेअरमुळे झाली, तर फक्त इन्फोसिस, टाटा कंझ्युमर्स, टायटन व जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर तोटा दाखवीत बंद झाले. सेन्सेक्समधील प्रमुख ३० पैकी फक्त इन्फोसिस १९ रुपये व टायटन पाच रुपये पडला.
Web Title: Investors News Hdfc Bank Raised The Share Price
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..