1 जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वे ट्रेन्सचं बुकिंग सुरु, 'हे' आहेत नियम, 'असं' करा तिकीट बुक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आता देशात चौथा लॉकडाऊन सुरु आहे.

मुंबई- देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आता देशात चौथा लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देशभरातले नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले. तिसऱ्या लॉकडाऊनच्या काळात मजुरांना आपआपल्या गावी सोडण्यासाठी भारतीय रेल्वे श्रमिक ट्रेन्स सुरु केल्या. त्यातच आता येत्या 1 जूनपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सुरू होणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. या ट्रेनचं बुकिंग आजपासून सकाळी 10 पासून सुरु झालं आहे. 

एक जूनपासून 200 स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार आहेत. या ट्रेन कोणत्या आहेत आणि वेळापत्रक रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलं आहे. यातल्या 50 ट्रेन्स एकट्या मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईहून जाणाऱ्या असतील.  सुरूवातीला फक्त नॉन एसी रेल्वे गाड्या धावणार असं रेल्वेनं स्पष्ट केले होतं. मात्र आता एसी आणि जनरल बोगीही असणार आहेत. तिकिटाची बुकिंग फक्त IRCTC च्या वेबसाइट आणि अॅपवरून करता येणार आहे.

रेल्वेनं जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार या ट्रेनमध्ये आरएसी आणि वेटिंग तिकिटे दिली जातील मात्र तिकिट वेटिंग असेल तर त्यांना ट्रेनमध्ये जाणाच्या परवानगी नसेल. तसंच या गाड्या या श्रमिक ट्रेन्स व्यतिरिक्त आहेत. या काळात श्रमिक ट्रेन मोठ्या प्रमाणावर धावणारेत. यासाठी अनेक नवे नियम करण्यात आलेत. रेल्वे स्टेशनवरची हॉटेल्स, फुड स्टॉल्स, बुक स्टॉल्स उघडण्याचा निर्णय रेल्वेने जाहीर केला आहे. ही दुकाने उघडण्यासाठी कार्यवाही सुरू करा असे आदेश रेल्वे विभागाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. पण हे करताना काही काळजी घेण्यासही सांगितलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर देशातली सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर देशभरात मजूर, कामगार, विद्यार्थी वेगवेगळ्या राज्यात अडकले होते. त्या काळात फक्त माल वाहतूक सुरू ठेवली होती. नंतर मजुरांना आपल्या राज्यात सोडण्यासाठी श्रमिक ट्रेन्स सुरू करण्यात आल्या. 

Breaking - 'नवरी नटली काल बाई सुपारी फुटली' फेम लोककलावंत छगन चौगुले यांचे कोरोनामुळे निधन
 

 

प्रवाशांची होणार स्क्रिनिंग

  • या स्पेशल 200 ट्रेनने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना रेल्वे निघण्यापूर्वी 90 मिनिटं आधी येणं बंधनकारक आहे. रेल्वेमध्ये बसण्यापूर्वी प्रवाशांचं स्क्रिनिंग होईल आणि त्यानंतरच त्यांना रेल्वेत बसण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. 
  • जर प्रवाशांमध्ये संक्रमणाचे लक्षण जाणवलं नाही तरच त्यांना प्रवास करता येणार असल्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. त्याऐवजी पूर्ण पैसे परत दिले जातील.
  • यात एकही अनरक्षित डबे नसतील, तिकीट बुक केलं आणि कन्फर्म असेल तरच प्रवास करण्याची आणि स्टेशनवर जाण्याची मुभा असणार आहे.
  • या प्रवासादरम्यान चादर, ब्लॅंकेट आणि पडदे दिले जाणार नाहीत. प्रवाशांनी घरातून निघताना आपलं सामान घेऊन निघावं. 
  • सर्व प्रवाशांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणं बंधनकारक आहे. त्यासोबत फेसमास्कही बंधनकारक करण्यात आलं आहे.
  • तिकीट ऑनलाइन करता येईल, बुकिंग काउंटर वर मिळणार नाही. तात्काळ किंवा ट्रेनमध्ये तिकीट दिल्या जाणार नाहीत.
  • ट्रेनमधला एसी हा मध्यम स्वरुपात असणार आहे. 
  • जेवण पुरवलं जाणार नाही, काही ट्रेन मध्ये आधी बुकिंग केल्यास पाणी आणि मर्यादित वस्तू पुरवल्या जातील.

तिकिट बुकींगची प्रक्रिया जाणून घ्या 

भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाईट www.irctc.co.in वर लॉग इन करा. 

वेबसाईटवर तुम्हाला LOGIN चा पर्याय दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर त्यात यूझर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा भरा. एखाद्याच IRCTC वर लॉगइन आयडी नसेल तर REGISTER ऑप्शनवर क्लिक करा. रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांक, नाव ईमेल आयडी आणि पत्ता टाकावा लागेल. 

ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही Book Your Ticket लिहिलेल्या बॉक्सवर क्लिक करा. त्यात आवश्यक अशी माहिती तुम्हाला टाकावी लागेल. तुम्हाला कोणत्या ठिकाणी प्रवास करायचा आहे त्याची माहिती भरा. From च्या पर्यायावर तुम्ही जेथून प्रवास करणार ते ठिकाण आणि To च्या पर्यायावर ज्या ठिकाणी जायचे आहे ते ठिकाण भरा. यानंतर तारीख सिलेक्ट करून Find Trains वर क्लिक करा.

मृतदेह चोरीप्रकरणात अखेर 'यांच्या' वर गुन्हा दाखल..वाशी पोलिसांनी दाखल केला गुन्हा..

तुम्ही भरलेल्या दोन्ही स्थानकांदरम्यान असलेल्या सर्व स्पेशल ट्रेनची यादी तुमच्या समोर ओपन होईल. त्यानंतर Check Availability & Fare चा पर्याय दिसेल. तिथेच तुम्हाला स्लिपर क्लास, एसी 3 टायर, एसी 2 टायर, एसी फर्स्ट क्लास, एसी चेअर कार आणि एग्जिक्युटिव्ह चेअर असे पर्याय दिसतील. Check Availability & Fare वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला कोणत्या ट्रेनचे तिकिट उपलब्ध आहे ते दिसेल. 

ज्या ट्रेनचे तिकिट तुम्हाला बुक करायचे आहे, त्यावर सिलेक्ट करा आणि Book Now वर क्लिक करा. 

बुक नाऊवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर प्रवास करणाऱ्या व्यक्तीचं नाव, वय, लिंग, मोबाइल नंबरसह इतर माहिती त्यात भरा आणि Continue Booking वर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर पेमेंटचा पर्याय असलेली विंडो ओपन होईल. यात रेल्वेनं तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंग किंवा मोबाइल वॉलेटच्या मदतीनं पेमेंट करण्याचा पर्याय दिला आहे. तुमच्या सोयीनुसार ते पेमेंट तुम्ही करु शकता. 

पेमेंट झाल्यानंतर तुमचे तिकिट बुक होईल. तिकिट बुक झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईल क्रमांकावर येईल. तिकिट बुक झाल्यानंतर प्रिंटचा पर्यायही येतो.

IRCTC starts online train bookings for the trains starting from 1st june


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IRCTC starts online train bookings for the trains starting from 1st june