Irshalwadi Landslide : ‘एनडीआरएफ’च्या जवानांची शर्थ! इर्शाळवाडीत चार दिवस राबले ११०० जण

इर्शाळवाडीत घडलेली दुर्घटना ही डोंगर चढून जाऊन हाताने मातीचा चिखल उपसण्याच्या कष्टाची परिसीमा गाठणारे बचावकार्य ठरले.
Irshalwadi Landslide
Irshalwadi Landslidesakal

नवी मुंबई - दरीत ढकलणारी उभी चढाई, शरीरही सावरता येऊ शकणार नाही, असा सोसाट्याचा वारा आणि चहुबाजूंनी पसरलेले धुक्याचे साम्राज्य अशा परिस्थितीत इर्शाळवाडीत अहोरात्र सुरू असलेले बचावकार्य अखेर रविवारी थांबले. बचावकार्यात १० ते १५ फुटांपर्यंतच्या मातीच्या ढिगाऱ्याखालून २२ जणांना जिवंत काढण्यात बचाव पथकांना यश मिळाले.

याआधी महाराष्ट्रात माळीण आणि तळिये अशा दोन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. इर्शाळवाडीत घडलेली दुर्घटना ही डोंगर चढून जाऊन हाताने मातीचा चिखल उपसण्याच्या कष्टाची परिसीमा गाठणारे बचावकार्य ठरले. पुणे येथील एनडीआरएफच्या जवानांच्या जीवाची शर्थ पाहता त्यांच्या या कार्याला इर्शाळवाडीसह स्थानिकांनी मनापासून सलाम केला.

इर्शाळवाडीतील ४३ पैकी ४० घरे दरडीखाली गाडली गेली. बुधवारी (ता. १९) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास इर्शाळवाडीवर दरडीने घाला घातला. गावात मोबाईलवर खेळत बसलेल्या तरुणाने खाली धावत येऊन माहिती दिल्यामुळे ही नैसर्गिक आपत्तीची घटना उघडकीस आली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांपाठोपाठ पुणे येथील एनडीआरएफची पथक सर्व सामग्री आणि लवाजमा घेऊन इर्शाळवाडीच्या पायथ्याशी धडकली. रात्री तीन वाजता पोहोचल्यावर एनडीआरएफच्या पहिल्या तुकडीने इर्शाळवाडीच्या दिशेने कूच केली.

मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, निसरड्या पायवाटा आणि चहुबाजूंनी दऱ्याखोऱ्यांत व्यापलेल्या धुक्यातून वाट काढत पहिल्या तुकडीतील ४५ जण कसलीही तमा न बाळगता चालत सुटले. इर्शाळवाडीला पोहोचण्यासाठी एक डोंगर पायी चालत जाण्यासाठी सामान्य माणसाला एक ते दीड तास लागतो; मात्र एनडीआरएफच्या जवानांनी अगदी ४० मिनिटांमध्ये तो सर करून इर्शाळवाडी गाठली.

हाताला जे काही मिळेल ते घेऊन थेट बचावकार्याला सुरुवात केली. काळोखात कसलाही अंदाज येत नव्हता. डोळ्यांना धूसर दिसणारा भव्य इर्शाळगड, पायाखाली चिखल आणि डोक्यावर कोसळणारा मुसळधार पाऊस अशा परिस्थितीत ढिगाऱ्याखालून येणाऱ्या आवाजांच्या दिशेने हातातील कुदळ आणि फावडे घेऊन एनडीआरएफच्या जवानांनी बचाव कार्याला सुरुवात केली.

स्थानिक गिर्यारोहकांच्या पथकांनीही जीवाची बाजी लावून मातीमध्ये अडकलेली जनावरे काढण्यास मदत केली. चिखलातून सुखरूप बाहेर काढणाऱ्यांना डोंगराच्या पायथ्याशी वसवलेल्या वैद्यकीय कक्षात पोहोचवण्याचे काम स्थानिक गिर्यारोहक करीत होते. १९ जुलैपासून सुरू झालेले अथक काम २३ जुलैपर्यंतच्या दुपारपर्यंत थांबलेच नव्हते.

२० जुलैला पुण्याहून एनडीआरएफच्या आणखी तीन तुकड्या मागवण्यात आल्या. तोपर्यंत २३ जुलैपर्यंत सलग चार दिवस एनडीआरएफच्या चार तुकड्या दिवसरात्र राबत होत्या. दोन तुकड्या काम आटोपल्यानंतर संध्याकाळी पुण्याला जाऊन पुन्हा सकाळी बचावकार्य करण्यासाठी ये-जा करीत होत्या; पण एकही दिवस एनडीआरएफच्या जवानांचे हात बचावकार्यादरम्यान थांबले नाहीत.

माळीण, तळियेपेक्षा मोठे आव्हान

माळीण व तळियेमध्ये झालेले बचावकार्य पोकलेन, जेसीबी आदी यंत्रांच्या सहाय्याने सोयीस्कर झाले होते; पण येथे चालत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने डोंगर चढून जाऊन शरीरातील ताकद जपून ठेवून पुन्हा कुदळ आणि फावड्याने अंदाज घेऊन चिखल उपसावा लागत होता. पावसाच्या संततधारेमुळे वारंवार येणारा चिखल मनाचे खच्चीकरण करणारा होता; परंतु एनडीआरएफच्या जवानांनी आपले अथक काम सुरूच ठेवले.

...तर मोठा अनर्थ झाला असता

पुणे येथे एनडीआरएफचा मोठा तळ आहे. महाराष्ट्र राज्य आणि गोवा या दोन्ही राज्यांत होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये अडकलेल्यांना वाचवण्यासाठी तेथील तुकड्या रवाना होत असतात. इर्शाळवाडी दुर्घटनेआधी काही दिवसांपासून पावसाने उत्तराखंड आणि दिल्लीत धुमाकूळ घातला होता.

या भागातील नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. त्या भागात अडकलेल्यांसाठी बचाव मोहीम राबवण्यासाठी पुण्यातील एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले; परंतु चार पथके राखीव ठेवण्यात आली होती. तीही पथके २० जुलैला दिल्लीकडे कूच करणार होती; परंतु यादरम्यान १९ जुलैच्या रात्री इर्शाळवाडीवर घडलेल्या दुर्घटनेची माहिती मिळताच या पथकांनी मार्ग बदलला आणि मोठा अनर्थ टळला.

मदतीचे आवाहन

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळून संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. इर्शाळवाडी ग्रामस्थांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी समाजाला ‘सकाळ रिलीफ फंड’कडून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

मदत करण्यासाठी...

१. HDFC Bank

A/C No : ५७५०००००४२७८२२

IFSC : HDFC००००१०३

Branch ः FC Road , Pune.

या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करून देणगी देऊ शकता.

२. मदत करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करून किंवा https://sakalrelieffund.com/ या संकेतस्थळावर जाऊन डोनेट नाऊवर क्लिक करून आपली देणगीची रक्कम डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड व बँक ट्रान्सफरमार्फत पाठवू शकता.

३. मदतीचे धनादेश दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात ११ ते ५ या वेळेत स्वीकारले जातील.

‘सकाळ रिलीफ फंडा’साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ‘८० जी’ कलमांतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.

अधिक माहितीसाठी

संपर्क : ८६०५०१७३६६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com