गोड्या पाण्यासाठी "इस्रायली सल्लागार'; BMC स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी

समीर सुर्वे
Monday, 8 February 2021

समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पासाठी इस्रायली कंपनीकडून BMC कडे प्रस्ताव आला आहे.

मुंबई  : समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पासाठी इस्रायली कंपनीकडून महानगरपालिकेकडे प्रस्ताव आला आहे. महानगरपालिकेने या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करून प्रकल्प अहवाल तयार करून निविदापत्रक तयार करण्याची जबाबदारी या कंपनीवर दिली आहे. सल्लागार कंपन्या कोणत्याही प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होत नाही; मात्र या कंपनीला निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. प्रकल्प उभारणीपासून 20 वर्षांच्या देखभालीसाठी तब्बल 3520 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. 

महानगरपालिका मनोरी येथे समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून पिण्याचे पाणी तयार करण्याचा प्रकल्प उभारणार आहे. प्रकल्पासाठी आयडीई वॉटर टेक्‍नॉलॉजीज या इस्रायली कंपनीने महानगरपालिकेला प्रकल्प उभारणीबाबत प्रस्ताव दिला होता; मात्र पालिकेने थेट प्रकल्प उभारण्याची परवानगी न देता या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. ही कंपनी प्रकल्पाचा विस्तृत अहवाल तयार करणार आहे. निविदांचा मसुदाही तयार करणार आहे. त्यासाठी पाच कोटी 90 लाख रुपयांचे शुल्क देण्यात येणार आहे. प्रस्तावाला आज स्थायी समितीने मंजुरी दिली. 
या प्रस्तावानुसार पहिल्या टप्प्यात रोज 200 दशलक्ष लिटर पिण्याचे पाणी तयार करण्यात येणार आहे. भविष्यातील गरजेनुसार हा प्रकल्प रोज 400 दशलक्ष लिटर क्षमतेपर्यंत वाढवता येऊ शकतो. मनोरी येथील 12 हेक्‍टर जागेची निवड महापालिकेने केली आहे. ही जागा राज्य पर्यटन विकास महामंडळाची असून, त्याबाबत महामंडळाशी पत्रव्यवहारही सुरू केला आहे. साधारणपणे प्रकल्पासाठी नियुक्त सल्लागार निविदा प्रक्रियेत सहभागी होता येत नाही; मात्र या कंपनीला निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. 

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती 
राज्यात अशा प्रकारचा प्रकल्प पहिल्यांदाच उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. ही समिती स्वत: संपूर्ण प्रक्रियेची पडताळणी करणार आहे. यात दोन अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि संबंधित विभागाच्या प्रमुखाचा समावेश असेल. 

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Israeli Adviser for sea water to Freshwater BMC approves proposal mumbai city marathi news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Israeli Adviser for sea water to Freshwater BMC approves proposal mumbai city marathi news