सरकारच्या आवाहनाला कोरोना योद्ध्यांनी प्रतिसाद दिला खरा परंतु स्वतः बाधीत झाल्यानंतर सरकारकडून कोणतीही मदत नाही

समीर सुर्वे
Monday, 10 August 2020

कोरोनाविरोधात लढा देताना लागण झालेल्या 176 डॉक्टरांपैकी अनेकांना सरकारकडून कोणतीही सुविधा मिळाली नसल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबई  : कोरोनाविरोधात लढा देताना लागण झालेल्या 176 डॉक्टरांपैकी अनेकांना सरकारकडून कोणतीही सुविधा मिळाली नसल्याचे उघडकीस आले आहे. ‘असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट’ (एएमसी) या डॉक्टरांच्या संघटनेकडून करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातून हे वास्तव पुढे आले आहे. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व खासगी डॉक्टरांना त्यांचे क्लिनिक आणि हॉस्पिटल सुरू ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील अनेक खासगी डॉक्टरांनी आपली हॉस्पिटल्स आणि क्लिनिक सुरू केली. तर, अनेकांनी सरकारसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका कोरोना योद्धा असलेल्या डॉक्टर, परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांनाही बसला. अनेक कोरोना योद्धांना त्याची लागण झाली. डॉक्टरांना कोरोनाची लागण होण्याची कारणे शोधण्यासंदर्भात समिती स्थापन करण्यासंदर्भात एएमसीने राज्य सरकारला दोन वेळा पत्र व्यवहार केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर एएमसीने मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या 176 डॉक्टरांचा सर्व्हे केला. 

रिया चक्रवर्तीनंतर ईडी करणार निर्माता संदीप सिंहची चौकशी - 

या डॉक्टरांना मे आणि जूनमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. लागण झालेल्या डॉक्टरांमध्ये 119 पुरुष तर 57 महिला डॉक्टर आहेत. यामध्ये 20 ते 35 वयोगटातील डॉक्टरांची संख्या 29 असून, 36 ते 50 वयोगटातील 70 डॉक्टर आहेत. 51 ते 60 वयोगटातील 54, 61 ते 80 वयोगटातील 23 डॉक्टर आहेत. खासगी हॉस्पिटल किंवा स्वत:च्या क्लिनिकमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या 80 टक्के डॉक्टरांकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचे उघडकीस आले. या डॉक्टरांना सरकारकडून कोणत्याही सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत खासगी क्लिनिकमध्ये रुग्णांवर उपचार करणार्‍या या डॉक्टरांना राज्य सरकारकडून सरकारी डॉक्टरांसाठी जाहीर केलेल्या 50 लाखांचा विमा योजनेचा लाभही देण्यात आला नव्हता. त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून हे डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करत होते. त्यामुळे, लागण झालेल्या डॉक्टरांनाही उपचारासाठी एक लाख 75 हजारांपर्यंत हॉस्पिटलचे बिल भरावे लागल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

त्याच प्रमाणे सरकारसोबत काम करत असलेल्या खासगी डॉक्टरांमधील कोरोनाची लागण झालेल्या 20 टक्के म्हणजे 14 डॉक्टरांना क्वारंटाईनची सुविधा नाकारण्यात आली तर अवघ्या दोन डॉक्टरांनाच ही सुविधा दिल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. 

विद्यार्थ्यांनो! आयटीआय प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

रुग्ण आणि नातेवाईकांमुळे डॉक्टरांना लागण -

खासगी हॉस्पिटल आणि क्लिनिकमध्ये कोरोना रुग्णांसह अन्य रुग्णांची सेवा करणार्‍या डॉक्टरांना कोरोनाची लागण ही रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे. तपासणीसाठी येत असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हे मास्क किंवा कोणत्याही कपड्याने तोंड झाकून घेत नव्हते. तसेच, डॉक्टरांशी बोलताना अनेक रुग्ण तोंडावरील मास्क काढत असल्याने डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It has been revealed that many of the 176 doctors who were infected while fighting corona did not receive any facilities from the government