तो पर्यंत शांत बसणार नाही; देवेंद्र फडणवीस गरजले!

तो पर्यंत शांत बसणार नाही; देवेंद्र फडणवीस गरजले!

ठाणे : स्वयंपुनर्विकासाचे धोरण राबवण्यासाठी रहिवाशांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून जोपर्यंत स्वयंपुनर्विकास धोरणांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान सरकारला दिला. 
ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये रविवारी ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्यावतीने गृहनिर्माण संस्थांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजप प्रवक्ता श्‍वेता शालिनी, माधवी नाईक, आमदार संजय केळकर, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, वास्तुविशारद मकरंद तोरसकर आदी उपस्थित होते. 
यावेळी फडणवीस म्हणाले, जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत अनेक अडचणी निर्माण होत असून नागरिकांच्या अनेक तक्रारी येत असतात. आमच्या सरकारच्या काळात अनेक कायदे, सवलती, धोरण तयार करण्यात आले. गेल्या 5 वर्षांत कामाची पद्धत आम्ही बदलली होती. तेव्हा स्वयंपुनर्विकास करण्याबाबत महापालिकेनेदेखील सकारात्मक भूमिका घेऊन सर्व बाबींचे पालन करून पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला पाहिजे. ठाण्यात 1 लाख परवडणारी नवी घरे बांधण्यात येणार आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आम्ही उत्तम काम केले असून, सामान्य जनतेला स्वस्तात घरे उपलब्ध व्हावी यासाठी ही योजना बनवण्यात आली आहे. ही योजना अंतिम टप्प्यात असली तरी मात्र, विद्यमान सरकारने या योजनेला अद्याप स्थगिती दिली नाही, असा चिमटा काढत हे सरकार या योजनेला स्थगिती देणार नाही, असा विश्‍वास व्यक्त केला. 

जनतेचे वकील म्हणून काम करू 
गेली 5 वर्षे आम्ही चांगले काम केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत होतो तेव्हा ताकदीने काम केले, आता विरोधी पक्षाच्या भूमिकेतही चांगले काम करू. आम्ही जनतेच्या कोर्टात जाणारे लोक आहोत. जनता हीच सुप्रीम आहे, तेव्हा जनतेचे वकील म्हणून काम करू. 2019 साली जनतेने विश्‍वास टाकून आम्हाला सत्तेच्या जवळ येऊन बसवले आहे, मात्र काही कारणास्तव सत्ता बसली नाही हे जनतेलादेखील समजते आहे. पुढील काळात जनतेकडे आशीर्वाद मागायला जाऊ तेव्हा नक्कीच यापेक्षा जास्त आशीर्वाद आम्हाला मिळेल, असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com