esakal | ITI प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

ITI प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

प्रवेशासाठी 2 लाख 55 हजार विद्यार्थांची नोंदणी...

ITI प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेस विद्यार्थांकडून यंदा कमी प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे आयटीआय प्रवेशाची मुदत दुसऱ्यांदा वाढविण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार विद्यार्थ्यांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहे. गुरुवार (ता.20) दुपारपर्यंत 2 लाख 55 हजार विद्यार्थांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.

आयटीआय प्रवेश अर्ज भरण्याची मुदत 21 ऑगस्टला संपणार होती. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्ज कमी आल्याने अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2015 ते 2019 या प्रत्येक वर्षी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेत प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या सरासरी 2.25 पट अर्ज प्राप्त झाले होते. परंतु यंदा कोरोना संसर्गामुळे उपलब्ध जागांच्या फक्त 1.45 पट अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कौशल्य प्रशिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

मोठी बातमी - गेल्या वर्षीही तेच झालं होतं, यंदाही तेच ! स्वीटी खेळताना घराबाहेर गेली आणि आई वडिलांना मिळाला मृतदेह

आयटीआय प्रवेशप्रक्रीया 1 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. राज्यातील 417 शासकीय व 569 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील 84 व्यवसाय अभ्यासक्रमांच्या 6 हजार 868 तुकड्यांमधून 1 लाख 45 हजार 632 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यापैकी अमरावती विभागात 17 हजार 984, औरंगाबाद विभागात 19 हजार 244, मुंबई विभागात 19 हजार 948, नागपूर विभागात 28 हजार 136, नाशिक विभागात 29 हजार 500, पुणे विभागात 30 हजार 820 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यासाठी 19 ऑगस्टपर्यंत 2 लाख 55 हजार 803 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 2 लाख 21 हजार 585 विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे. त्यापैकी 2 लाख 07 हजार 285 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठीचे विकल्पही भरले आहेत. तर 48 हजार 518 विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश अर्ज भरलेला नाही. प्रवेश अर्ज मोबाईल व्दारे देखिल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दुर्गम व ग्रामिण भागात जेथे इंटरनेट जोडणीत अडचणी आहेत तेथील विद्यार्थी स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अथवा अन्यत्र प्रवेश अर्ज भरण्यासाठी जातात. तथापि, काही भागात स्थानिक लॉकडाऊन असल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. तसेच एकुण उपलब्ध जागांच्या तुलनेत प्राप्त प्रवेश अर्ज अधिक असले तरी काही विशिष्ट व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी वा काही तालुक्यांत उपलब्ध जागांच्या तुलनेत कमी विकल्प प्राप्त झाल्याचे देखिल निदर्शनास आले आहे. नियमित प्रशिक्षण सुरू होण्यासाठी अवकाश असल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवेशासाठी विद्यार्थांना होणार मदत

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचण आल्यास त्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीची किंवा प्रादेशिक विभागनिहाय नेमून दिलेल्या कॉलसेंटरची मदत घ्यावी. तसेच आवश्यकता भासल्यास नजिकच्या आयटीआय संस्थेशी संपर्क साधून विहित मुदतीत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची दक्षता घ्यावी. कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वत:चे जिवनमान उंचावण्यासाठी उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री मलिक यांनी केले आहे.

iti admissions get extension for filling forms now candidates can fill form till 31st august

loading image
go to top