
मुंबई : सर्व्हरची समस्या व हॉलतिकिट वाटपाच्या घोळामुळे आयटीआय अभ्यासक्रमाच्या "ईलेक्ट्रीशियन कोर्स' आणि "कम्प्युटर ऑपरेटींग अँण्ड प्रोग्रॅंमिंग' या दोन विषयांची ऑनलाईन परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की डायरेक्टरेट जनरल आँफ ट्रेनिंगवर (डीजीटी) आज ओढावली. कोणतीही लेखी सूचना न देता परीक्षा आयोजित केल्याने परीक्षा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध झाले नाही. त्यामुळे अखेर परीक्षाच रद्द झाल्याने राज्यातील सुमारे 15 हजार विद्यार्थ्यांना याचा फटका बसला.
केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या डायरेक्टरेट जनरल आँफ ट्रेनिंग (डीजीटी) च्या माध्यमातून आयटीआयची परीक्षा घेण्यात येते. "ईलेक्ट्रीशियन कोर्स' आणि "कम्प्युटर ऑपरेटींग ऍण्ड प्रोग्रॅमिंग' या दोन विषयांची ऑनलाईन परीक्षा जुलै-आँगस्ट 2020 मध्ये घेण्यात येणार होती. परंतु, कोरोनामुळे लांबणीवर गेलेली परीक्षा 28 व 29 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत घेण्याचे निर्देश देण्यात आले. याबाबतच्या तोंडी सूचना राज्यातील आयटीआय प्रशिक्षण संस्थांना देण्यात आल्या. पण, परीक्षेच्या एक दिवस आधीपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना हॉलतिकीटच मिळाले नाही. विद्यार्थी आणि पालक परीक्षेचा वेळ होईपर्यंत हॉलतिकीट डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर परीक्षेची वेळ जवळ आल्याने हॉलतिकीटाशिवाय विद्यार्थ्याना परीक्षेस बसू देण्याच्या सूचना डीजीटीने दिल्या; मात्र त्यानंतरही विद्यार्थ्यांमागचे शुक्लकाष्ठ संपले नाही. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लॉगीनसाठी असंख्य अडचणी येत होत्या. काही जणांना प्रश्नपत्रिकाच दिसत नव्हती. काहींच्या डेस्कस्टॉपवर एरर मेसेज येत होता; तर अनेकांची प्रोफाईल आणि क्यूआर कोडच गायब होता. परीक्षा संपण्याची वेळ आली तरी या तांत्रिक अडचणी दूर होत नसल्याने अखेर गुरुवारी (ता.28) परीक्षा रद्द झाल्याचे डीजीटीला जाहीर करावे लागले.
गोंधळानंतर सॉफ्टवेअर अपग्रेडच्या सूचना!
परीक्षेचा गोंधळ पाहता डीजीटीने ऐनवेळी संगणकामधील विंडोज 7 सॉफ्टवेअर विंडोज 10 मध्ये अपग्रेड करण्याच्या सूचना दिल्याचे असोसिएशन ऑफ नॉन गर्व्हमेंट आयटीआयचे सचिव देवेंद्र पाटणे यांनी सांगितले. पदवी तसेच तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांप्रमाणे या विद्यार्थ्यांचे पुर्वीच्या परीक्षेच्या आधारावर मूल्यमापन केले असते; तर विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगाराची संधी लगेच उपलब्ध झाली असती असेही पाटणे म्हणाले.
डायरेक्टरेट जनरल आँफ ट्रेनिंगने या परीक्षांचे आयोजन केले होते. केंद्राच्या पोर्टलवरील काही तांत्रिक समस्येमुळे परीक्षा होऊ शकलेली नाही. ही परीक्षा पुन्हा घेण्याविषयी कोणतीही सूचना मिळालेली नाही. काही ठिकाणी परीक्षा रद्द झाली असली; तरी काही विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली आहे.
- दिगंबर दळवी,
परीक्षा नियंत्रक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र
------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.