जे. जे. रुग्णालयात काळ्या फिती लावून परिचारिकांचं आंदोलन

भाग्यश्री भुवड
Tuesday, 1 September 2020

आज सकाळपासून परिचारिकांच्या न्याय आणि रास्त मागण्यासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात झाली आहे.

मुंबईः महाराष्ट्र राज्यातील परिचारिकांनी आजपासून संपाचे हत्यार उपसलं आहे. विविध मागण्यांसाठी त्यांनी संपावर जाण्याचा पवित्रा घेतला आहे. आज सकाळपासून परिचारिकांच्या न्याय आणि रास्त मागण्यासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात झाली आहे.

यावेळी सर जे. जे समूह रुग्णालय मुंबई येथे ही आधीसेविका कार्यालयासमोर राज्य उपाध्यक्षा हेमा गाजबे आणि सर ज जी समूह रुग्णालय अध्यक्षा आरती कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली मॉर्निग शिफ्टसाठी आलेल्या परिचारिकांनी काळी फिती लावून आणि घोषणा देत आंदोलनात आपला सहभाग दर्शवला. 

 

परिचारिकांना काही मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून रखडवले जात आहे. त्यामुळे, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्यावतीने परिचारिकांच्या मागण्यांसाठी 1 सप्टेंबर 2020 पासून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही देण्यात आले होते. मात्र, त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे, आजपासून परिचारिका सरकार विरोधात आपला निषेध व्यक्त करत आहे. 

 

या मागण्यांसाठी परिचारिका संपावर जाणार

  • गेल्या अनेक वर्षापासून सर्व स्तरावरची पदे रिक्त आहेत, त्या पदांची नियमित भरती करणे गरजेचे आहे. परिचारिकांची संख्या अत्यल्प आहे त्यामुळे सर्व स्तरावरचे पदोन्नती आणि पदभरती अत्यावश्यक आहे. 100% परिचारिकांच्या पदभरतीसाठी शासनाने परवानगीही दिली आहे. मात्र प्रत्यक्षात पदभरती झालेली नाही.
  • कोविड कक्षात रोटेशन करताना अत्यंत अपुरे मनुष्यबळ असल्याने आणि रुग्ण संख्या क्षमतेपेक्षा खूप जास्त असल्यामुळे परिचारिकावर प्रचंड मानसिक ताण येतो, म्हणून 7 दिवस रोटेशन आणि 7 दिवस क्वारंटाईन हा क्रम कायम ठेवावा. तसेच, प्रोटीनयुक्त आहार आणि चांगल्या दर्जाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. 
  • केंद्र शासनाप्रमाणे जोखीम भत्ता नव्याने मंजूर करून देण्यात यावा.
  • कोणत्याही घटनेत अधिकाराचा गैरवापर करून परिचारिकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर विनाविलंब कडक कार्यवाही करण्यात यावी.
  • राज्यातील परिचारिकांना फक्त रुग्णसेवेचीच कामे द्यावी, ग्रामीण रुग्णालय स्तरावर मासिक अहवाल तयार करणे, डाटा एन्ट्री इ. कारकुनाची कामे त्यांच्याकडून काढून घेण्यात यावी.

8 सप्टेंबर पासून काम बंद आंदोलनाच्या तयारित

आजपासून 7 सप्टेंबरपर्यंत काळ्या फिती लावून परिचारिका काम करणार आहेत आणि निदर्शने करणार आहेत. जर तरीही मागण्या मान्य झाल्या नाही तर, 8 सप्टेंबर 2020 या दिवशी एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात येईल, त्यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपावर जातील असे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या उपाध्यक्ष हेमलता गाजबे यांनी सांगितले आहे.

(संपादनः पूजा विचारे) 

J. J. Hospital Nurses wearing black ribbons Protest


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: J. J. Hospital Nurses wearing black ribbons Protest