बदलापुरातील पुरात जैन दाम्पत्याची भूतदया

गिरीश त्रिवेदी
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

बदलापूरजवळील चामटोलीतील गणराज जैन व डॉ. अर्चना जैन दाम्पत्य भटक्‍या, अपंग व पीडित प्राणी सांभाळत असून, शुक्रवारच्या पुरात या प्राणी आणि पक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्‍यात घालून काळ, वेळ कशाचीही तमा न बाळगता या दाम्पत्याने अविश्रांत मेहनत घेतली. 

बदलापूर : बदलापुरातील २६ जुलैच्या महापुराची सर्वत्र भीतीयुक्त चर्चा सुरू आहे. सामाजिक बांधिलकी जपणारे सामाजिक कार्यकर्ते समाजातील अन्य घटकांच्या मदतीसाठी तन मन धन अर्पून कार्य करतानाही पाहिले आहे. बदलापूरजवळील चामटोलीतील गणराज जैन व डॉ. अर्चना जैन दाम्पत्य भटक्‍या, अपंग व पीडित प्राणी सांभाळत असून, शुक्रवारच्या पुरात या प्राणी आणि पक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्‍यात घालून काळ, वेळ कशाचीही तमा न बाळगता या दाम्पत्याने अविश्रांत मेहनत घेतली. 

 महाड येथून वांगणीत स्थायिक झाल्यावर गणराज जैन आणि त्यांच्या पत्नी डॉ. अर्चना जैन यांनी चामटोली येथे रेल्वेच्या बाजूला पश्‍चिमेकडे एक जागा घेतली आणि या जागेत चक्क त्यांनी अपंग व भटक्‍या प्राण्यांचे अनाथाश्रम सुरू केले. त्याला ‘पाणवठा’ असे नाव देत त्यात ३ घोडे, ६ गायी, १ माकड, १२ मांजरी, ६ पोपट, ३ टर्की, ५ बदके आणि ९ भटकी अपंग कुत्री अशी प्राणी-पक्षी संपदा त्यांनी सांभाळली. जैन यांच्या पाणवठ्यात ४५ प्राणी व पक्षी होते.

मात्र, २६ जुलैच्या महापुरात सर्व जण महालक्ष्मी एक्‍सप्रेसमधील प्रवाशांना वाचवत असतांना गणराज आपल्या कुटुंबातील या सदस्यांना वाचवण्यासाठी धडपड करीत होते. २५ प्राणी पक्षी त्यांनी वाचवले. ८ मृतदेह त्यांनी शोधले तर उर्वरीत प्राणी-पक्षी शोधण्यासाठी आजही ते मेहनत घेत आहेत. 

२४ प्राण्यांना वाचवण्यात यश
२६ जुलैच्या रात्री उशिरा गणराज यांना पाणवठ्यात पाणी शिरू लागल्याचा निरोप मिळाला. त्यांनी तात्काळ या पाणवठ्याकडे धाव घेतली. एकेक प्राणी घेऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ते घेऊन येत होते. तीन तासात जेमतेम २४ प्राणी पाणवठ्यातून काढून बाहेर आणण्यात त्यांना यश आले. पाण्याची पातळी वाढू लागल्याने त्यांना बाळाराम कांबरी व त्यांच्या सहकऱ्यानी ‘आता तुम्ही पाणवठ्यात जाऊ नका परिस्थिती बिकट होत आहे’, असा सल्ला दिला. मात्र, त्यांनी गाई घोडे व उर्वरित कुत्र्यांना मोकळे सोडून दिले आणि माकडाला खांद्यावर घेऊन पोहत पूर्वेकडे आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jain couple's ghost in Badurapur