Ulhas River : अबब! नदी हरवली कुठे? उल्हासनदीवर शेकडो मिटरपर्यंत जलपर्णीचे आच्छादन!

तहान भागविणाऱ्या जलस्त्रोताकाडे प्रशासनाचे दुर्लक्ष
Ulhas River Jalparni
Ulhas River Jalparnisakal

- मोहिनी जाधव

बदलापूर - संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील साधारण एक कोटी नागरिकांची तहान भागवणाऱ्या, उल्हास नदीच्या प्रदुषणात दिवसागणिक भर पडत असून, उल्हास नदीवर थोडी थोडकी नव्हे तर आता शेकडो मिटर पर्यंत मोठ्या प्रमाणात जलपर्णीने चादर आच्छादलेली पहायला मिळत आहे.

बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या वालिवली जवळचे पात्र या जलपर्णीने व्यापले आहे. त्यात ऐन पावसाळ्या पूर्वी ही जलपर्णी काढून टाकण्याची गरज असताना ही संबंधित प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचे लक्षात येत आहे.

ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी पाण्याचा मोठा स्त्रोत असणारी उल्हास नदी म्हणजे, जिल्ह्यातील बहुतांश शहरांच्या पाणी पुरवठ्यासाठी ही नदी महत्वाची आहे. त्यात पुणे जिल्ह्यातल्या आंध्र धरणातून सोडले जाणारे पाणी उल्हास नदीला येऊन मिळते. हेच पाणी बदलापूर शहरात असलेल्या बॅरेज बंधाऱ्यावरून उचलले जाते. ते पाणी बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पुरवण्यात येते.

पुढे याच नदीत बारवी धरणातून पाणी सोडले जाते. ते जांभूळ, शहाड येथे उचलले जाते आणि जिल्ह्याला पुरवले जाते. व पुढे ही नदी उल्हासनगर शहरातून वाहत असताना येथे देखील नदीचे पाणी अडवून पाणी उचलले जाते. मात्र जिल्ह्यासाठी इतक्या महत्वाच्या असलेल्या या उल्हास नदीचे प्रदुषण गेल्या काही वर्षात मोठ्या वाढत जात आहे.

त्यातच उल्हास नदीत अनेक शहरे, आणि गावांचे सांडपाणी सोडले जाते. काही औद्योगिक वसाहतीतून अवैध रित्या रासायनिक सांडपाणी नदी पात्रात सोडल्याच्याही घटना या आधी समोर आल्या आहेत. या सर्व प्रदुषणामुळे उल्हास नदीच्या पात्रात जलपर्णी वाढत आहे. चार वर्षांपूर्वी उल्हास नदीतील ही जलपर्णी काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सगुणा रूरल फाऊंडेशनला पाचारण केले होते.

त्यांनी केलेल्या उपाययोजनेनंतर जलपर्णी नष्ट झाली होती. मात्र नदीत मिसळणारे सांडपाणी थांबले नाही. त्यामुळे पुन्हा नदीला जलपर्णीचा त्रास होत आहे. त्यात पावसाळ्यापूर्वी यावर उपाय योजना होणे गरजेचे होते कारण, अतिवृष्टीमुळे उल्हासनदीला पूर येतो. त्यामुळे यंदा देखील नदी काठावरील ग्रामस्थांनी या समस्ये बाबतीत नाराजी व्यक्त केली आहे.

यावर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, जलपर्णी ही बदलापुरातील उल्हास नदीच्या पात्रात आली असली तरी, अजून आपल्या पालिका प्रशासनाकडे जलपर्णी काढून टाकण्यासाठीची आवश्यक यंत्रणा उपलब्ध नाही. त्यात उल्हासनगर शहरात देखील या नदीचे पात्र असून, या ठिकाणी देखील पाणी अडवले जाते.

त्यामुळे उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ पालिकेला सूचित करण्यात येईल व लवकरच दोन्ही पालिका व बदलापूर नगरपालिका या तिन्ही शहरातील प्रशासनाच्या मदतीने, जलपर्णी काढण्यासाठीचे काम सुरू करण्यात येईल. व नदीपात्रावरील जलपर्णी काढून टाकण्यात येईल असे गोडसे यांनी सांगितले. मात्र यासाठी किती वेळ लागेल याची कल्पना नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com