भाजपने आतापासूनच उठाबशा काढल्या तर निदान थोडीफार मजल गाठता येईल, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला!

सुमित बागुल
Friday, 20 November 2020

मुंबई भाजप कार्यकारिणी बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी २०२२ मध्ये मुंबई मनपावर भाजपचाच भगवा फडकवण्याचा निश्चय केलाय.

मुंबई : मुंबईत येऊ घातलेली २०२२ ची मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होणार यात कोणतीही शंका नाही. नुकतीच मुंबई भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीतून २०२२ च्या मुंबई मनपाच्या निवडणुकांचं भाजपने रणशिंग फुंकलं. अशात काँग्रेसनेही मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची इच्छा व्यक्त केलीये. काँग्रेस राज्यातील सत्तेत शिवसेनेसोबत आहे. गेले वीस वर्ष मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. अशात काँग्रेसने येत्या निवडणुकांमध्ये काय करते यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. 

मुंबई भाजप कार्यकारिणी बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी २०२२ मध्ये मुंबई मनपावर भाजपचाच भगवा फडकवण्याचा निश्चय केलाय. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी फडणवीसांवर उपरोधिक टीका केलीये. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी की कशी लढवावी हे काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. मात्र महाविकास आघाडीनं एकत्र येऊन मुंबई महापालिकेची निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे, हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. त्यामुळे आपली मुंबईत किती ताकद आहे हे आधी पाहावं आणि त्यांचा पराभव निश्चित आहे. मात्र भाजपने आतापासूनच उठाबशा काढल्या तर निदान थोडीफार मजल गाठता येईल, असं वक्तव्य जयंत पाटीलांनी केलंय. 

महत्त्वाची बातमी : पवारसाहेब, "मराठा स्त्रीला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री करायची भूमिका तुम्ही घेतली तर त्याला समर्थन"

जयंत पाटील यांनी वाढीव वीजबिलांबाबत देखील आपलं मत मांडलं. जयंत पाटील म्हणालेत की, राज्यात महावितरण कंपनी तोट्यात आहे, तिला उभारी देण्याचं काम करावं लागणारा आहे. एकीकडे वितरण कंपनीही तोट्यात आहे आणि सामान्य नागरिकांवरही बोजा आहे. मात्र महावितरण कंपनी फडणवीस सरकारच्या काळातच तोट्यात गेली आणि हा एवढा बोजा का वाढला ? याची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. वाढीव विजबिलाच्या संदर्भात कसा तोडगा काढायचा यावर चर्चा सुरू आहे, यातून लवकरचं मार्ग काढू. मात्र 67 हजार कोटी रुपयांची थकबाकी फडणवीसांच्या काळातचं थकली असा आरोपही जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर केलाय. 

मुंबईतील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय मुंबई मनपाचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांची घेतला आहे. यावर देखील जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. २३ पासून राज्यातल्या शाळा सुरू होत आहेत. मात्र मुंबईतली परिस्थिती आटोक्यात राहावी म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला असेल, मात्र राज्यात काही ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. तिथले स्थानिक प्रशासन राज्य सरकारला कळवून निर्णय घेतील. यामध्ये पालकांनी गोंधळून जाण्याचं कारण नाही असंही जयंत पाटील म्हणालेत. 

महत्त्वाची बातमी :  ३१ डिसेंबरपर्यंत महापालिका, सरकारी आणि सर्व खासगी शाळा बंदच राहणार, इकबाल सिंह चहल यांचा निर्णय

पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड यांच्या प्रचाराचं नियोजन करण्यासाठी पुण्यातील काँग्रेस भवन कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील, विश्वजित कदम आणि शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी  उपस्थित होते. पुणे पदवीधर मतदारसंघात उद्यापासून महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुरुवात होतीये, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित काम करतील राज्यातील पाच ठिकाणी महाविकास आघाडीचे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार विजयी होतील, आम्ही ही निवडणूक जिंकू असा विश्वास जयंत पाटलांनी यावेळी व्यक्त केला. 

jayant patil devendra fadanavis BMC election electricity bills congress vs shivsena


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jayant patil devendra fadanavis BMC election electricity bills congress vs shivsena