जितेंद्र आव्हाड म्हणाले गणेश नाईकांना कोरोनाचा ब्रॅंड ऍम्बेसेडर करा; मग गणेश नाईक ही आव्हाडांना असे म्हणाले..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 March 2020

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरातील वातावरण राजकीय धुळवडीने चांगलेच तापले आहे. आमदार गणेश नाईक यांना कोरोना व्हायरसचे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर करा, अशी खरमरीत टीका राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाईकांवर केली.

नवी मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरातील वातावरण राजकीय धुळवडीने चांगलेच तापले आहे. आमदार गणेश नाईक यांना कोरोना व्हायरसचे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर करा, अशी खरमरीत टीका राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाईकांवर केली. नवी मुंबईतील काळे धंदे नाईकांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. शहरातील सर्वात मोठा खंडणीबहाद्दर कोण असेल तर तो गणेश नाईक आहे, असा खळबळजनक आरोप आव्हाड यांनी केला. "तेरे बस की बात नही, तेरे बाप को बोल... नाम पूछा तो बोल... गणेश नाईक' अशा फिल्मी अंदाजात नाईक यांनी अभिनेते नाना पाटेकर यांचा डायलॉग बोलून आव्हाड यांना जशाच तसे प्रत्युत्तर दिले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना भाषणातून दिलेल्या आव्हान-प्रतिआव्हानांच्या चित्रफिती समर्थकांकडून समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल केल्या जात आहेत. 

कोपरखैरणे येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे आयोजित मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून जितेंद्र आव्हाड यांना बोलावण्यात आले होते. त्या वेळी आव्हाड यांनी बोलताना नाईकांचा समाचार घेतला. "पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अनेक वेळा दौऱ्यावर असताना दिवसाला किमान पाच हजार लोकांना भेटत असतील, कधी कोणाशी हात मिळवत असतील; तर कोणाच्या खांद्यावर हात ठेवत असतील; पण कधी हात धुतले नाहीत. मात्र नाईकांनी कधी कोणाशी हात मिळवला की लगेच डेटॉलच्या बाटलीने हात धुतला पाहिजेत. लोकांबद्दल घृणा असलेला असा माणूस मी कधीच पाहिलेला नाही', अशा शब्दात आव्हाड यांनी नाईकांवर टीका केली. अनधिकृत बांधकामांवरून आव्हाडांनी नाईकांवर टीकास्र सोडले. लोकांच्या बिल्डिंगांना नाईकांनी नेहमी अनधिकृत म्हणून हिणवले. पण स्वतः दगडखाणींजवळ अनधिकृत बांधकामे केली. व्हाईट हाऊस, ग्लास हाऊस हे काय आहे? आम्हाला नाईक नेहमी गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक शिकवतात. अरे पण त्यांनी दिलेली समानतेची शिकवण तुम्ही कधी पाळली नाहीत, अशी उदाहरणे देत आव्हाड यांनी नाईकांच्या घराणेशाहीवर टीका केली. 

गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक, ज्ञानेश्वर नाईक आता थोडे दिवसांनी संकल्प नाईक पण येईल, नशीब घरात 65 जण नाहीत. नाही तर पालिकेतील सर्व नगरसेवक घरातलेच असते, अशी आव्हाड यांनी टर उडवली. जे गणेश नाईक कधी बाळासाहेबांचे होऊ शकले नाहीत; ते शरद पवारांचे काय होतील? पवारांच्या पायावर शस्त्रक्रिया होत असताना नाईक पक्षांतर करण्याच्या बैठकीत मग्न होते, अशी टीका आव्हाड यांनी नाईकांवर केली. 2014 लाच गणेश नाईक भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होते, असा आरोप आव्हाड यांनी केला. नाईकांनी ठाण्यातील माझ्या नगरसेवकांमध्ये भांडणे लावण्याचे काम केले. मला संपवण्यासाठी कटकारस्थाने रचली. अशा नाईकांची सत्ता मोडीत काढण्यासाठी पुढील एक महिन्यात मी रोज नवी मुंबईत येणार असल्याचा इशारा आव्हाड यांनी नाईकांना दिला. असा हा लोकनेता; जो लोकांना आजही कधी भेटत नाही, कोणाकडे नेत्याचा फोन नंबर नाही. असा नेता लोकनेता कसा असू शकतो? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. 

ही बातमी वाचा ः पन्नास वर्षे बाबांनी महाराष्ट्र जपला : सुप्रिया सुळे
आव्हाडांचे गौप्यस्फोट 
दिघ्यात जेव्हा गरिबांच्या इमारती पडत होत्या, तेव्हा हे लोकनेता गणेश नाईक कुठे गेले होते? त्या नगरसेवक नवीन गवतेवर काय वेळ आली होती, हे त्यालाच ठाऊक, पण तोसुद्धा येत्या 12 मार्चला एकतर शिवसेना; नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येईल, असा गौप्यस्फोट गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. आमदार म्हात्रे यांना संपवण्याचा नाईकांनी विडा उचलला होता. त्यांचे नगरसेवकपदाचे तिकीट कापून नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांना देण्याचे काम नाईकांनी केले. म्हात्रेंचे तिकीट कापण्यासाठी नाईकांनी जीवाचे रान केले, असा आरोप आव्हाड यांनी केला. विरोधी पक्षनेते विजय चौगुले, मंदा म्हात्रे, एम. के. मढवी हे गणेश नाईकांमुळेच पक्ष सोडून गेले, असा आरोप आव्हाड यांनी केला. 

नाईकांचे आव्हाडांना प्रत्युतर 
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदार गणेश नाईकांवर केलेल्या आरोपांना नाईकांनी चोख प्रत्युत्तर दिले. ऐरोलीत महिला दिनानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना "ये तेरे बस की बात नही, तेरे बाप को बोल, नाम पूछा तो बोलो, गणेश नाईक', अशा शब्दात नाईकांनी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे डायलॉग मारून आव्हाड यांना उत्तर दिले. कोणी मुंबई, कोणी ठाणे; तर कुणी पुणे आणि कुणी साताऱ्यावरून या शहराचा कारभार चालवू शकतील का? आणि करू शकत असाल तर पहिले तुमच्या शहरातील विकास करा ना. मग आमच्या शहरात या अक्कल शिकवायला. असे बोलून नाईकांनी मविआच्या नेत्यांना आव्हान दिले. "हाथी चलता है अपनी चाल... बाकी काय समजायचे आहे ते समजा', अशा फिल्मी स्टाईलने नाईकांनी विरोधकांना उत्तर दिले. नाईकांवर जर खंडणीबहाद्दराचे आरोप असतील तर मग तक्रार करा, हा गणेश नाईक तुमच्या समोर उभा आहे मोठ्या ताकदीने, असे बोलून विरोधकांना आव्हान दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jitendra Awhad said that Ganesh Naik should be brand ambassador of Corona; Then Ganesh Naik said to Aiwad: