डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाची नुसतीच रंगरंगोटी; स्वच्छता आणि सुविधांच्या वानवा

शर्मिला वाळुंज
Saturday, 16 January 2021

तज्ज्ञांअभावी बंद असलेले आरोग्य विभाग, गंजलेले मशिन्स, भितींचे कोसळलेले प्लास्टर हे सारे काही लपवण्यासाठी प्रशासनाने केवळ बाहेरील पॅसेजमध्ये व लसीकरण विभागास रंगरंगोटी केली आहे.

डोंबिवली - कोविड लसीकरणामुळे शास्त्रीनगर रुग्णालयाची दोन दिवसांपूर्वीच रंगरंगोटी करण्यात आली. पॅसेजमधील स्वच्छता आणि नवी रंगरंगोटीमुळे बाह्यरुपाने सजलेले शास्त्रीनगर रुग्णालयातील वातावरण प्रसन्न वाटत असले तरी रुग्णालायतील विभागांमध्ये डोकावताच क्षणाधार्त ही प्रसन्नता लोप पावली. तज्ज्ञांअभावी बंद असलेले आरोग्य विभाग, गंजलेले मशिन्स, भितींचे कोसळलेले प्लास्टर हे सारे काही लपवण्यासाठी प्रशासनाने केवळ बाहेरील पॅसेजमध्ये व लसीकरण विभागास रंगरंगोटी केली होती. कोरोनाची लस आल्याने त्यावर मात करीत हम होंगे कामयाबचा नारा आज सर्व डॉक्टरांनी दिला असला तरी रुग्णांना योग्य त्या सोयीसुविधा देण्यात पालिकेचे रुग्णालय कधी कामयाब होणार हाच प्रश्न उपस्थित राहातो.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालय गेले कित्येक वर्षे दुरावस्थेच्या गर्तेत अडकलेले आहे. त्याविषयी सातत्याने चर्चा होत असल्याने केवळ दर्शनी भागाची डागडुजी करण्यात सत्ताधारी धन्यता मानतात. मध्यंतरी रुग्णालयाच्या दरवाजातील व दर्शनी भागातील छताचे प्लास्टर तुटल्याने रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. परंतू स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हिरवा कंदील दिल्यामुळे तुटलेल्या भागाची दुरुस्ती करत रुग्णालय सुरु करण्यात आले. कोरोना काळात शासन निर्देशानुसार या रुग्णालयात कोरोना केंद्र म्हणून घोषित करुन येथे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यावेळीही रुग्णांची संख्या जास्त व जागेची कमतरता, विलगीकरणात ठेवलेल्या एका तरुणाने खिडकीतून उडी मारुन पळ काढल्याने येथील सुरक्षितता, सुविधा यासर्वांवर प्रश्नचिन्ह उभे राहीले होते.

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा 

कोरोनाची लस आल्यानंतर शनिवारी डोंबिवली विभागातील कोरोना लसीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर कधीनाही तेवढी स्वच्छता रुग्णालयात दिसून आली. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील पॅसेज, लसीकरण कक्षाची नव्यानेच रंगरंगोटी केली होती. दोन दिवसांपासून येथे रंगरंगोटीचे काम सुरु असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. बाह्यरुपाला सुंदर करण्याचे काम प्रशासनाने केले असले तरी रुग्णालयातील विविध विभागांत डोकावताच रुग्णालयाचे खरे वास्तव नजरेस पडते. भिंतींची झालेली पडझड, कोसळलेले प्लास्टर, कोपऱ्यात गंजत पडलेल्या मशीन्स आणि रिकाम्या खाटा पाहून गोरगरीबांचा खरा आधार असणारे हे रुग्णालय कधी सुधारणाच असा प्रश्न पडतो.

Just the colors of Shastrinnagar Hospital in Dombivli Lack of sanitation and facilities

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Just the colors of Shastrinnagar Hospital in Dombivli Lack of sanitation and facilities