काकस्पर्श होतोय दुर्मीळ! पितृ पंधरवड्यात कावळ्यांना महत्त्व; पण संख्या कमी 

अमोल सांबरे 
Saturday, 5 September 2020

एरवी दुर्लक्षीत असलेला कावळ्याला पितृ पंधरवडा सुरू झाला की महत्त्व दिले जाते. असे असले तरी गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात कावळ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे.

 

विक्रमगड ः एरवी दुर्लक्षीत असलेला कावळ्याला पितृ पंधरवडा सुरू झाला की महत्त्व दिले जाते. असे असले तरी गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात कावळ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. गणेशोत्सवानंतर लगेचच पितृ पंधरवडा सुरू होतो. या दिवसांत आपल्या पूर्वजांना नैवेद्य (घास ठेवण्याची) परंपरा बऱ्याच काळापासून चालत आली आहे. या दिवसांत पित्रांना अर्थात कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तींना त्यांच्या आवडीची फळे, वस्तू आणि जेवण कावळ्यांच्या नावाने वाढण्याची ही रूढी-परंपरा आहे. त्यासाठी प्रत्येक जण आपल्या घरातील पूर्वजांना त्यांच्या तिथीनुसार नैवेद्य देतो. या दिवसांत महत्त्व असते ते कावळ्याला. कावळा जोपर्यंत घास शिवत नाही तोपर्यंत घरातील कुणीही जेवणास बसत नाहीत, अशी रूढी पाळली जाते.

सुशांत सिंह ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी मोठी बातमी, शौविक-सॅम्युअलची रवानगी NCB कोठडीत

आजही बऱ्याच ठिकाणी ही परंपरा जपली जात आहे. मात्र, सध्या या कावळ्यांची संख्याच कमी झालेली दिसून येत आहे. पितरांच्या नैवेद्याला शिवण्यासाठी कावळ्यांना साद घालूनही ते फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे बऱ्याचदा केवळ साकडे घालून जेवण आटपावे लागते. उपद्रवी, संधिसाधू समजल्या जाणाऱ्या कावळ्यांची पितृ पंधरावड्याव्यतिरिक्त कुणालाही फारशी आठवण येत नाही. मात्र या दिवसांत कावळ्याची तासनतास वाट पाहिली जाते. ग्रामीण भागात या प्रथा पाळण्याचे प्रमाण अधिक दिसते. 

आजच्या आधुनिक युगात नैवेद्य घराच्या कौलावर, पत्र्यांवरही ठेवले जातात. पिढ्यांपिढ्या चालत आलेल्या परंपरेचा उलगडा होत नसला तरी हा पितृ पंधरवडा मात्र मोठ्या श्रद्धेने प्रत्येक घरात, तसेच खेड्यापाड्यात आजही पाळला जातो. 

दुसऱ्या पत्नीच्या वारसाला आर्थिक भरपाईमध्ये वाटा;  उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

कावळ्यांची संख्या कमी - 
कावळा हा मानवी वसाहतीजवळ राहणारा पक्षी आहे. एप्रिल ते जूनदरम्यान कावळ्यांचा विणीचा हंगाम असतो. जन्मलेल्या पिलाचे पोषण नर-मादी दोघेही करत असतात. गाव कावळा व डोम कावळा असे कावळ्यांचे प्रकार असून त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पितरांच्या नैवेद्याला शिवण्यासाठी कावळ्यांना साद घालूनही ते फिरकेनासे झाले आहेत. 

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kakasparsh is rare! Importance of crows in the patriarchal fortnight; But the numbers are low