कळंबोली- कामोठे मार्गावरील नाल्यांची रखडपट्टी

सकाळ वृत्‍तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

बसथांब्याजवळ पाणी; प्रवाशांची गैरसोय

मुंबई : शीव-पनवेल महामार्गावरील कळंबोली ते कामोठे बस थांब्यादरम्यान सुरू असलेल्या पावसाळी नाल्याचे काम अपूर्णावस्थेत असल्याने येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भर पावसात रस्त्यावर आलेल्या पाण्यात उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. 

शीव-पनवेल महामार्गावरील कळंबोली ते कामोठ्यादरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील पावसाळी नाल्याचे काम गेली काही वर्षे रखडलेले आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यासाठी १७०० कोटी रुपयांचा खर्च केला. मात्र मार्गालगत पावसाळी नाल्याचे काम करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने दर वर्षी पावसाळ्यात कळंबोली ते कामोठे; तसेच स्पेगेटी टोल नाका ते कोपरा-खारघरपर्यंतचा रस्ता पाण्याखाली जाऊन वाहनचालकांना वाहन चालवणे अवघड होते. अखेर उशिराने जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या वर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्याच्या कामाला सुरुवात केली असली, तरी हाती घेण्यात आलेले काम पूर्ण होऊ न शकल्याने या वर्षीसुद्धा परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.  

नाल्याचे खोदकाम करण्यापूर्वी किमान पदपथावर उभे राहून बसची वाट पाहणे शक्‍य होत होते. खोदलेल्या पदपथामुळे अडचणीत भर पडली आहे. 
- शाकीर शेख, प्रवासी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalamboli - drainage along the Kamothe route