कळवा रुग्णालयाची अग्निसुरक्षा ताळ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

ठाणे शहरातील आस्थापना आणि वास्तूंना अग्निसुरक्षेचे धडे देणाऱ्या महापालिकेला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अग्निसुरक्षा ढेपाळल्याचे वृत्त दै. "सकाळ'मध्ये (ता. 31 डिसेंबर) प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर तातडीने रुग्णालय प्रशासनाने याची दखल घेत मुदत संपलेले अग्निशमन सिलिंडर) तात्काळ बदलण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदाराला दिले. त्यानुसार नवीन वर्षात नवे फायर इक्‍स्टिंग्विशर रुग्णालयात बसवण्यात आले आहेत. 

ठाणे : ठाणे शहरातील आस्थापना आणि वास्तूंना अग्निसुरक्षेचे धडे देणाऱ्या महापालिकेला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अग्निसुरक्षा ढेपाळल्याचे वृत्त दै. "सकाळ'मध्ये (ता. 31 डिसेंबर) प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर तातडीने रुग्णालय प्रशासनाने याची दखल घेत मुदत संपलेले अग्निशमन सिलिंडर) तात्काळ बदलण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदाराला दिले. त्यानुसार नवीन वर्षात नवे फायर इक्‍स्टिंग्विशर रुग्णालयात बसवण्यात आले आहेत. 

ठाणे महापालिकेचे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय असल्याने शेकडोच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. रुग्णालयाचा व्याप मोठा असल्याने दरवर्षी या रुग्णालयावर 100 कोटींहून अधिक निधी खर्च होत असतो. तरीही रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेसाठी बसवण्यात आलेली अग्निशमन यंत्रे कालबाह्य झाली असल्याची बाब समोर आली होती. याबाबत दै. "सकाळ'ने आवाज उठवताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने हालचाली करून नवीन वर्षात रुग्णालयातील सर्व फायर इक्‍स्टिंग्विशर बदलण्यास सुरुवात केली आहे. 

कळवा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण (ओपीडी) विभागात सकाळच्या सत्रात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी उसळलेली असते. तेव्हा आग अथवा इतर कुठीलीही दुर्घटना घडू नये यासाठी रुग्णालयात ठिकठिकाणी फायर इक्‍स्टिंग्विशरचे सिलिंडर बसवण्यात आले आहेत. 12 ऑक्‍टोबर 2018 रोजी बसवण्यात आलेल्या या सिलिंडरची मुदत 11 ऑक्‍टोबर 2019 रोजी संपली होती.

दोन महिने उलटले तरीही हे सिलिंडर बदलण्यात आले नसल्याने रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणावर टीका होत होती. अखेर प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईचा पर्दाफाश केल्यानंतर महापालिकेला जाग आली. त्यानुसार 3 जानेवारी 2020 रोजी सिलिंडर बदलले असून जानेवारी 2021 पर्यंत या नवीन सिलिंडरची मुदत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. 

कळवा रुग्णालयातील अग्निशमन यंत्रे कालबाह्य झाल्याची माहिती संबंधित ठेकेदारासह महापालिका व्यवस्थापनाला दिली होती. तसेच त्याचा वेळोवेळी पाठपुरावादेखील करीत होतो, परंतु ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे नवीन यंत्रणा बसवण्यास उशीर झाला असावा. तरीही अग्निसुरक्षेची हेळसांड होऊ नये म्हणून रुग्णालय आवारात अग्निशमन दलाचे वाहन सेवेसाठी तैनात ठेवले असून नवीन सिलिंडर बसवण्यात आले आहेत. 
- डॉ. संध्या खडसे, अधिष्ठाता, 
कळवा रुग्णालय 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalwa hospital fire safety