कल्याण-डोंबिवलीत 'स्वाइन फ्लू' रुग्णांच्या संख्येत होतेय दिवसेंदिवस वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

swine flu

कल्याण-डोंबिवलीत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत पालिका हद्दीत दोन रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

कल्याण-डोंबिवलीत 'स्वाइन फ्लू' रुग्णांच्या संख्येत होतेय दिवसेंदिवस वाढ

डोंबिवली - कल्याण-डोंबिवलीत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत पालिका हद्दीत दोन रुग्णांचा मृत्यु झाला आहे. स्वाइन फ्लू चा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी सर्दी, खोकला, घसादुखी, ताप अशी साथीची लक्षणे दिसली तरी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःला अलगीकरण करावे, गर्दीत जाऊ नये, तसेच मास्कचा वापर करावा असे आवाहन पालिकेचा आरोग्य विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे. स्वाईन फ्लू च्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहीम राबविण्यावर भर दिला जात आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 01 जून 2022 पासून स्वाइन फ्लूचे 48 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 22 रुग्ण हे उपचार घेत आहेत. 24 रुग्ण डिस्चार्ज झाले असून 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. मृत रुग्ण सहव्याधीग्रस्त असून त्यात 85 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिलेचा समावेश आहे. महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय, शास्त्रीनगर रुग्णालय तसेच वसंत व्हॅली येथे स्वाइन फ्लूचे लसीकरण केंद्र चालू करण्यात आली आहेत.

सदर लस दुसऱ्या व तिसऱ्या महिन्यातील गरोदर महिला, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणाऱ्या व्यक्ती व फ्ल्यू रुग्णांची तपासणी, देखभाल, उपचारात सहभागी असलेल्या डॉक्टर्स, नर्सेस आरोग्य कर्मचारी यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर लस कोरोना लसी सोबत घेण्यात येऊ नये तसेच कोरोना लस व स्वाइन फ्लू लस यामध्ये किमान दोन आठवड्याचे अंतर असावे. ही लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या शरीरात इन्फ्लुएंन्झा विरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास किमान दोन आठवड्याचा कालावधी लागतो आणि यामुळे मिळालेली प्रतिकारशक्ती जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत टिकू शकते त्यामुळे हे लसीकरण दरवर्षी घेणे आवश्यक ठरते अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.