आधी 'त्या' 6500 कोटी पॅकेजचा हिशोब द्या !

मयुरी चव्हाण-काकडे
सोमवार, 25 मे 2020

कोरोनाच्या आजारावर सर्वतोपरी उपाय करण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असून, राज्य सरकारनेही केंद्राप्रमाणे पॅकेज जाहिर करावे, असे मत  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच व्यक्त केले.

कल्याण: कोरोनाच्या आजारावर सर्वतोपरी उपाय करण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असून, राज्य सरकारनेही केंद्राप्रमाणे पॅकेज जाहिर करावे, असे मत  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच व्यक्त केले. यावर फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीसाठी जाहीर केलेल्या 6500  कोटींच्या पॅकेजचा हिशोब द्यावा मग सरकारवर टीका करावी, असे सांगत फडणवीस यांच्यावर  निशाणा साधला आहे. नुसते पॅकेज जाहीर करून काम होत नाही तर ठाकरे सरकार प्रत्यक्षात योग्यरीतीने व प्रामाणिकपणे काम करत असून भाजप विविध पॅकेज जाहीर करून नागरिकांना गाजरच देत आले आहे.  त्यामुळे गाजर पार्टीने आम्हाला शहाणपण शिकवू नये, असे सांगत शिवसैनिकांनी भाजपचा समाचार घेतला आहे.
    
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दमदार भाषण करत शहरांच्या विकासासाठी 6500 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेला आता चार वर्षे उलटून गेली असून, पॅकेजची घोषणा म्हणजे केवळ  गाजर असल्याची टीका सेनेच्या गोटातुन होऊ लागली आहे. या पॅकेजमधून  रस्ते सुधारणा, जल आणि मलनिस्सारण, आरोग्य, रेल्वे स्थानकांचा विकास, ई- गर्व्हनन्स, प्रदूषण नियंत्रण, गरिबांसाठी घरे, उद्याने आणि मैदाने आदी सोयीसुविधाद्वारे शहरांमध्ये "विकास" केला जाईल, असे आपल्या भाषणात  फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. आता ही घोषणा स्थानिक भाजप नेत्यांच्या अंगलट येत असून, सेनेने पुन्हा  या पॅकेजचा विषय छेडत भाजपावर तोफ डागली आहे.

केवळ पॅकेज जाहीर करून जनतेला गाजर देणारा आमचा पक्ष नाही,  भाजपाने  कल्याण डोंबिवली साठी जाहीर केलेल्या पॅकेजचा एक रुपयाही आला नाही. गाजर पार्टीने शिवसेनेला सल्ला देऊ नये.शिवसेना पक्ष प्रत्यक्षात काम करणारा आहे केवळ मार्केटिंग करणारा नाही
- महेश गायकवाड, नगरसेवक, शिवसेना.

मेट्रो व इतर विकासकामे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून निधी भाजपच्या माध्यमातून देण्यात आला आहे. ही कामे पाहिले तर पॅकेजचा हिशोब देण्याची गरज नाही.  कामांचे श्रेय घेण्यास सेना बॅनरबाजी करते. 6500 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले तेव्हा सेनेनेही श्रेय घेतले होते.
- मोरेश्वर भोईर, भाजप, नगरसेवक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalyan dombivli 6500 package and shivsena bjp politics