Kalyan Lok Sabha: श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात ट्विस्ट? भाजपा पदाधिकाऱ्यांचे थेट बावनकुळेंना पत्र

ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघ हा कळीचा मुद्दा बनत चालला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व या मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे.
Mp Shrikant Shinde and chandrashekhar bawankule
Mp Shrikant Shinde and chandrashekhar bawankulesakal

डोंबिवली - ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघ हा कळीचा मुद्दा बनत चालला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व या मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा असून उमेदवारीची माळ डॉ. शिंदे यांच्याच गळ्यात पडण्याची चिन्हे आहेत.

खासदार शिंदे यांना तिकीट मिळवण्यासाठी देखील मित्रपक्षातील अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यातच आता दिवा भाजप मंडळच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण लोकसभा निवडणूक हि भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली असून शिंदे यांच्यापुढे आणखी एक आव्हान उभे केले आहे.

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून भाजपने आपली पहिली यादी देखील जारी केली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील महत्वाचे असलेले ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघ हा भाजपला देण्यात यावा अशी मागणी येथील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते करत आहेत.

स्थानिक पातळीवर असलेली शिवसेना व भाजपा पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत धुसफूस याच मुद्द्यावरूनच कल्याण लोकसभा मतदारसंघात चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या मुलाचा कल्याण लोकसभा मतदारसंघ अबाधित राखणे व तो पुन्हा जिंकून आणणे म्हणजे प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे.

कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात उघड उघड नाराजी दिसून आल्यावर आता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या दिवा येथे देखील शिवसेनेविषयी नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.

भारतीय जनता पार्टी दिवा शहरच्या वतीने दिव्यात नुकतीच एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोक पाटील, नरेश पवार, विनोद भगत, जिल्हा चिटणीस विजय भोईर, सपना भगत, रोशन भगत, गणेश भगत यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने यावेळी कल्याण लोकसभा निवडणुक ही भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी असा निर्णय घेतला आहे. आणि तसे निवेदन त्यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे.

या निवेदनात म्हणण्यात आले आहे की, बावनकुळे यांना या पत्राद्‌वारे विनंती करू इच्छितो कि भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेसाठी अबकी बार 400 पार हा नारा देण्यात आला आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघात पक्षीय ताकद पाहता तसेच या मतदार संघातील आमदार आणि नगरसेवकांची संख्या बळ पाहता भारतीय जनता पार्टीच्या खासदार साठी पोषक असे वातावरण आहे. दिवा शहरातील असंख्य भाजपच्या कार्यकर्त्याची व मतदारांची एक मताने एक मुखाने हीच मागणी आहे, की कल्याण लोकसभेसाठी उमेदवार हा कमळ चिन्हावरच लढावावा.

याविषयी दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना आम्ही विनंती केली आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोणीही असो पण चिन्ह मात्र कमळच असो अशी आम्ही मागणी केली आहे कारण या मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आहे येथे भाजपचे तीन आमदार आहेत त्यातील एक मंत्री आहे.

तसेच कल्याण ग्रामीण, डोंबिवली, दिवा मतदारसंघात देखील भाजपची ताकद मोठी आहे. मतदारांचा कौल देखील भाजपच्या बाजूने आहे. अब की बार 400 पार हे जे ध्येय्य आहे ते कमळ चिन्हावरच शक्य होईल बाकी कोणत्या चिन्हावर शक्य होणार नाही. त्यामुळे आता फक्त कमळच असे भोईर यांनी म्हटले आहे.

यामुळे भाजप आता येथे आपला उमेदवार देतो की शिंदे यांना दिवा येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागते हे आता पहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com