
कल्याणच्या पत्रिपुलाचे काम रखडणार?
कल्याण : कल्याण-शिळफाटा रोड रेल्वे लाईनवरून नव्याने होणाऱ्या पुलासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन झालेले नाही. तसेच जवळ असलेल्या गृहसंकुलाची एनओसी न मिळाल्याने या नव्याने होणाऱ्या तिसऱ्या पत्रिपुलाच्या मार्गिकेचे काम रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भिवंडी-कल्याण-शिळफाटा रोड रेल्वे लाईनवरून जाणारा १०४ वर्षे जुना पत्रीपूल धोकादायक झाल्याने १८ नोव्हेंबर २०१८ रोजी पाडण्यात आला. ३० डिसेंबर २०१८ रोजी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पत्रीपुलाचे भूमिपूजन झाले. अनेक अडथळे आल्याने कल्याण-डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीला त्रास सहन करावा लागला. त्या पुलासाठी आंदोलने झाली. अखेर तीन वर्षांनी २५ जानेवारी २०२१ रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नवीन पत्रीपुलाचे ऑनलाईन उद्घाटन झाल्याने वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका झाली.
दरम्यान, भिवंडी-कल्याण-शिळफाटा रोड सहा पदरी सिमेंट रस्ता राज्याचे रस्ते विकास महामंडळामार्फत बनविण्यात येणार असल्याने पत्रिपूल ही सहा पदरी बनविण्यात येणार आहे. आता तिसऱ्या दोन पदरी पत्रीपुलाचे काम सुरू झाले आहे. पावसाळा आणि कोरोना लॉकडाऊनमुळे काम संथगतीने सुरू होते. या कालावधीत सिमेंट रस्त्याच्या कामाला वेग आला असून लवकरच ती कामे पूर्ण होईल. नव्याने बांधण्यात आलेल्या पत्रीपूलप्रमाणे तिसरा पत्रीपूल ही बांधण्यात येणार असून त्याचे गर्डरचे काम दिल्लीमध्ये सुरू असून ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. कल्याणमधील कामे पूर्ण होताच गर्डर आणला जाईल, अशी माहिती रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, पत्रीपुलाच्या कामाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते विधिमंडळाच्या कामात व्यस्त असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
जूनमध्ये काम पूर्ण होण्याचा दावा
नव्याने बांधण्यात येणारा पत्रीपूल जून २०२२ च्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीला खुला करण्याचा दावा रस्ते विकास महामंडळ करत आहे. मात्र, भूसंपादन आणि सोसायट्यांच्या एनओसीमुळे कामाला वेळ लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे आहे. अडथळा असणाऱ्या पत्रीपुलाच्या काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणीला जोर धरू लागला आहे.
Web Title: Kalyan Patri Pool Third Bridge May Be Delayed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..