Gram panchayat election | शिवसेना आणि मनसेत रस्सीखेच; सरपंचपदासाठी तुफान राजकीय धुमश्चक्री

शर्मिला वाळुंज
Monday, 8 February 2021

ग्रामपंचायत निवडणुक निकालाचा परिणाम कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांवरही होणार आहे. डोंबिवलीत मनसेचे पदाधिकारी फोडल्याने मनसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

डोंबिवली - कल्याण लोकसभेतील काही ग्रामपंचायतीच्या सरपंच पद निवडणूक प्रक्रीया सोमवारी पार पडल्या. वडवली शिरढोणमध्ये शिवसेनेने आपला भगवा फडकवला तर काकोळेमध्ये मनसेने प्रथमच सरपंच पदाचा मान पटकाविला आहे. खरडमध्ये महाविकास आघाडीने मनसेशी युती करीत सेनेचा सरपंच बसवित भाजपला गार केल्याचे पहायला मिळाले. या गावांत सरपंच पदाची उत्सुकता आता संपली असली तरी खोणी वडवलीचा निकाल मात्र उद्यावर ताणला गेला आहे. मनसेने खेळी करीत येथे शिवसेनेला दिवसभर तंगून ठेवल्याचे दिसून आले. वेळेत गणपूर्तता न झाल्याने उद्या सरपंच पदाची निवडणूक होईल असे निवडणूक अधिकाऱ्यांनी अखेर जाहीर केले. बहुमत मिळूनही सेनेला सरपंच पदासाठी येथे शर्थीचे प्रयत्न करावे लागत असल्याचे दिसून येत आहे. 

सरपंच पदाच्या निवडणूका मंगळवारी असल्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत होती. कोठे बिनविरोध, कोठे आधीच स्पष्ट झालेला निकाल असल्याने शांततेत सरपंच पदाच्या निवडणुका पार पडल्या. निवडणूकी आधीपासूनच खोणी वडवलीत राजकीय वातावरण तापलेले असल्याचे पहायला मिळाले आहे. मतदान दिवशीही दोन गटातील कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याने सरपंच निवडीच्या दिवशीही वाद होण्याची शक्यता वर्तविली जात होती. येथील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळपासूनच परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. येथे शिवसेनेचे 5, मनसेचे 3, भाजपचे 2 आणि राष्ट्रवादीचे 1 सदस्य निवडून आले आहेत.

शिवसेना मनसेमध्ये सरपंच पदासाठी चुरस असून सोमवारी शिवसेनेचे पाचही सदस्य ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित होते. दुपारी 2.30 च्या सुमासार मनसेचे 3 सदस्य कार्यालयाजवळ आले. परंतू वेळ संपल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित करीत त्यांना उद्या येण्यास सांगितले. यावेळी मनसे सदस्यांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. याचवेळी सेनेचे कार्यकर्तेही पुढे आल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पांगविले. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी सदस्यांना घेऊन तेथून लगेच काढता पाय घेतला. मनसेच्या या हालचालीने सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी चलबिचल झाली. या सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी ठाण्यातील शिवसेनेचे शिलेदार उपस्थित होते. परंतू गणपूर्तताच होऊ न शकल्याने त्यांनाही खाली मान घालून येथून काढता पाय घ्यावा लागला. एका रात्रीत आता गावात काय घडते ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले असून उद्या सरपंच पदाचा मान कोणाच्या पक्षात पडतो याची उत्सुकता ताणली गेली आहे. शिवसेनेच्या वंदना ठोंबरे यांनी तर मनसेच्या जयश्री ठोंबरे यांनी सरपंच पदासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे शिवसेना की मनसे कोणाच्या हाती खोणी वडवली सरपंच पद लागते हे पहाणे औतुस्क्याचे ठरेल. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामपंचायत निवडणुक निकालाचा परिणाम कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांवरही होणार आहे. डोंबिवलीत मनसेचे पदाधिकारी फोडल्याने मनसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यातच खोणी वडवली येथे मनसेने सदस्य उशीरा पाठवित ही निवडणुक लांबवित शिवसेनेला तंगत ठेवून जशास तसे उत्तर दिल्याची चर्चा दिवसभर होती. 

 

सोमवारी सरपंच पदासाठी दोन तर उपसरपंच पदासाठी एक अर्ज प्राप्त झाला आहे. परंतू गणपूर्तता होऊ न शकल्याने तसेच वेळ संपल्याने सरपंच पदाची निवडणूक प्रक्रीया मंगळवारी पार पडेल. 
सुधीर बोंबे,
निवडणूक विस्तार अधिकारी

 

सरपंच पदाचा मान यांना
काकोळे ग्रामपंचायतीमध्ये मनसेच्या रेश्मा गायकर सरपंचपदी, तर नरेश गायकर यांची उपसरपंच पदी निवड झाली. वडवली शिरढोण मध्ये शिवसेनेच्या अरुणा पाटील यांची सरपंचपदी, केशव पाटील यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. तर खरड ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या संतोष भगत आणि राष्ट्रवादीचे धर्मा गायकर यांची उपसरपंच पदी निवड झाली आहे. येत्या 10 फेब्रुवारीला मांगरुळ, नेवाळी, हाजीमलंग वाडी, नाणेर, बुद्रुल आणि उसाटणे याठिकाणची सरपंचपदाची निवडणुक होणार आहे.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

kalyan political marathi news Political developments in khoni vadavali grampanchayat election politics thane district


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalyan political marathi news Political developments in khoni vadavali grampanchayat election politics thane district