Kalyan Rain : 24 तास उलटले तरीही चिमुरडी बेपत्ताच; बाळाच्या धसक्याने आई आजारी

चिमुरडी पाण्यात वाहून गेल्याच्या घटनेला 24 तासाहून अधिक काळ उलटला आहे. मात्र अद्यापही तिचा शोध लागलेला नाही. एनडीआरएफच्या टिमने तीन तास शोध घेतल्यानंतर बचाव कार्य थांबविले.
Old baby Missing
Old baby Missingsakal

डोंबिवली - ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे पटरी वरुन चालत जाताना मध्ये नाला आला. नाल्यावरुन जाताना आईचा पाय डगमगला कुशीतील चिमुरडीला काही होऊ नये म्हणून तिने मुलीला वडिलांकडे दिले. परंतू मुलीला धरायला वडील गेले आणि चार महिन्यांची नात त्यांच्या हातून निसटली. ती निसटली ती थेट नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.

चिमुरडी पाण्यात वाहून गेल्याच्या घटनेला 24 तासाहून अधिक काळ उलटला आहे. मात्र अद्यापही तिचा शोध लागलेला नाही. एनडीआरएफच्या टिमने तीन तास शोध घेतल्यानंतर बचाव कार्य थांबविले आहे. तर केडीएमसीचे अग्निशमन पथक अजूनही तिचा शोध घेत आहे. मुलीच्या विरहाने आईला धसका बसला असून तीची तब्येत बिघडली आहे. त्या बाळाचे नेमके काय झाले असेल या विचारानेच सारेजण हळहळ व्यक्त करत आहेत.

हैद्राबाद येथे राहणारी योगिता रुमाले ही बाळंतपणासाठी भिवंडी येथे माहेरी आली होती. ऋषिका हिच्यावर जन्मापासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुधवारी ऋषिकाच्या रुटीन चेकअप साठी योगिता व तिचे वडील ज्ञानेश्वर हे मुंबईला गेले होते. तेथून परतत असताना त्यांनी अंबरनाथ लोकल पकडली होती.

कोपर रेल्वे स्थानकात उतरुन ते अप्पर कोपर स्थानकातून गाडी पकडून भिवंडीला जाणार होते. परंतू कोपर स्थानकात त्यांना उतरता आले नाही. त्यांनी कल्याणमध्ये उतरुन भिवंडी जाण्याचे ठरविले. ठाकुर्ली च्या आसपास लोकल तास दोन तास थांबल्याने त्यांनी गाडीतून उतरून पटरी वरुन चालत जाऊन कल्याण स्टेशन गाठण्याचा निर्णय घेतला.

मात्र त्यांची दिशा चुकली. लोकलच्या डाव्या बाजूने ते उतरले. पत्रीपूलाच्या आसपास असलेल्या एक नाला पार करताना लोकलच्या बाजूला जागा नव्हती. तेथील पाईपलाईन वरुन नाला पार करत असताना योगिता हीचा पाय डगमगला. तिने तिच्या कुशीत असलेली चिमुरडी वडिलांच्या हातात दिली.

योगिताला सावरायला जाताना वडिल ज्ञानेश्वर यांच्या हातून चिमुरडी निसटली आणि थेट नाल्याच्या प्रवाहात पडली. नाल्यातील पाण्याला वेग जास्त असल्याने चिमुरडी क्षणात दिसेनासी झाली. चिमुरडी वाहून जाताच आईने एकच हंबरडा फोडला हा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आणि सगळ्यांचेच हृदय हेलावले.

बुधवारी दुपारी 5 वाजण्याच्या आसपास अग्निशमन दल व शिवसेना आपत्ती व्यवस्थापन पथक चिमुरडीचा शोध घेत होते. परंतू ती सापडली नाही. पावसाची संततधार सुरु असल्याने तसेच पाण्याला वेग असल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. सायंकाळी 6 च्या दरम्यान एका महिलेने पाण्यात काही दिसत आहे असे सांगितले. सर्वांनी त्या दिशेने धाव घेतली.

बाळ सुखरुप मिळेल या आशा सर्वांच्या पल्लवीत झाल्या पण तो कचरा निघाला. त्यानंतरही रात्री 8 वाजे पर्यंत अग्निशमन दलाचे जवान बाळाचा शोध घेत होते. कल्याण तहसीलदार जयराज देशमुख, विष्णूनगरचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मोहन खंदारे यांनी देखील घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. त्यानंतर अंधार पडल्याने बचावकार्य थांबविण्यात आले होते.

गुरुवारी सकाळी तहसीलदार देशमुख यांनी एनडीआरएफची मदत घेत चिमुरडीचा पुन्हा शोध खाडी परिसरात सुरु केला. एनडीआरएफच्या एका टिमने तब्बल तीन तास ठाकुर्ली, कल्याण, भिवंडी खाडी किनारा, कांदळवन परिसरात बोटीच्या सहाय्याने बाळाचा शोध घेतला.

मात्र बाळ दिसून न आल्याने त्यांनी बचाव कार्य थांबविल्याचे दुपारी 1 च्या दरम्यान थांबविले. कल्याण अग्निशमन दलाचे जवान बाळाचा शोध घेत असून मुंब्रा पर्यंत हे पथक पाहणीसाठी गेले असल्याची माहिती डोंबिवली रेल्वे पोलिसांनी दिली.

या घटनेला 25 तास उलटले तरी चिमुरडीचा शोध लागलेला नाही. चिमुरडीच्या धसक्याने तिच्या आईची तब्येत बिघडली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दुपारी 3 च्या दरम्यान एक लहान मुलगी आजोबांच्या हातून नाल्यात पडून वाहून गेल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार अग्निशमन दलाच्या सहाय्याने मुलीचा शोध सुरु केला गेला. रात्री अंधार पडल्याने तसेच सतत पाऊस सुरु असल्याने शोधकार्यात अडथळा येत होता. रात्री 8 नंतर शोध कार्य थांबविण्यात आले होते. सकाळी 10 वाजल्यापासून एनडीआरएफ च्या टीमने शोध कार्य सुरु केले. तीन तास शोध घेऊनही मुलीचा शोध लागलेला नाही. त्यामुळे एनडीआरएफने त्यांचे शोध कार्य थांबविले आहे.

- अर्चना दुसाने

नाल्यात पडून मुलगी वाहून गेल्याचे आम्हाला माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री आमची टिम आली होती, परंतू अंधार असल्याने मुलीला शोधता आले नाही. सकाळी टिम घटनास्थळी येऊन किनारा परिसर, झाडी झुडपांत बाळाचा शोध घेतला आहे. मात्र आम्हाला बाळ आढळून आले नाही. यामुळे आम्ही शोध कार्य थांबविले आहे.

- योगेश कुमार, एनडीआरएफ जवान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com