Kandalvan : कांदळवनांची घुसमट; गावातील कचरा खाडीकिनारी; जैवविविधता धोक्‍यात

रायगड जिल्ह्यात समुद्र किनारपट्टीच्या गावांमध्ये डम्पिंग ग्राऊंडच नाहीत
kandalvan raising awareness mangrove waste management system Biodiversity
kandalvan raising awareness mangrove waste management system Biodiversitysakal

अलिबाग : किनारपट्टीवरील जैवविविधतेच्या रक्षणात कांदळवने महत्त्‍वाची असल्‍याने त्यांच्या संवर्धनासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहेत, परंतु वाढती लोकसंख्या आणि घनकचऱ्यांमुळे ही कांदळवने संकटात आली आहेत.

रायगड जिल्ह्यात समुद्र किनारपट्टीच्या गावांमध्ये डम्पिंग ग्राऊंडच नाहीत. त्यामुळे गावातील कचरा थेट खाडीपात्रात टाकला जातो. यामुळे हजारो एकर कांदळवनांचे पर्यायाने जैवविविधतेचे अस्‍तित्‍व धोक्‍यात आले आहे.

उरण, अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या नगरपालिकांमध्ये डम्पिंग ग्राऊंड नाही. त्याचबरोबर अनेक ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची सुविधा नाही. यामुळे कचरा थेट खाडी किनारी असलेल्या कांदळवनांमध्ये टाकला जातो.

दरवर्षी कांदळवनावरील अतिक्रमणे वाढत असल्याने यात न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. न्यायालयाच्या आदेशाने, अतिक्रमण झालेली कांदळवनांची आठ हजार ८४३ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यासाठी वनविभागाला सूचित केले आहे. यापैकी साधारण ३०० हेक्टर जमिनीवर कचऱ्याचे साम्राज्‍य आहे. ही जागा अद्यापही वनविभागाला ताब्यात घेता आलेली नाही.

kandalvan raising awareness mangrove waste management system Biodiversity
Mumbai Crime : दुसऱ्या लग्नासाठी त्याने पोटच्या मुलाला संपवले

न्यायालयाने ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये डम्पिग ग्राऊंडची समस्या आहे, अशा ठिकाणी डम्पिंग ग्राऊंडसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ग्रामपंचायती, नगरपालिकांना पर्यायी जागा निर्माण करणे शक्य नाही, त्यांनी कचऱ्याची विल्हेवाटीसाठी व्यवस्था करावी, असे आदेश आहेत. जिल्ह्यात अशी व्यवस्था कोणत्याच ग्रामपंचायतीने केली नसल्‍याने किनारपट्टीलगतच्या गावांमध्ये जमा केलेला कचरा असाच कांदळवनामध्ये टाकला जातो.

डम्पिंग ग्राऊंडमुळे प्रदूषणात वाढ

डम्पिंग ग्राऊंडवर टाकलेल्‍या कचऱ्याचे खाऱ्या पाण्यामुळे विघटन होत नाही. अनेक दिवस कचरा पडून राहिल्‍याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. अनेकवेळा प्रमाणापेक्षा जास्त कचरा जमा झाल्‍यास आग लावली जाते.

त्‍यामुळे कांदळवनांनाही धग बसते. अलिबाग नगरपालिकेच्या डंम्पिग ग्राऊंडमध्ये दोन महिन्यापूर्वी अशीच आग लागली होती. ही आग तीन दिवस धुमसत राहिल्याने नागरिकांचा श्वासाचे व्याधी जडल्‍या. कचऱ्यामुळे जलप्रदूषण, वायू प्रदूषणातही भर पडत असून डम्पिंग ग्राऊंड लगतच्या नागरिकांचे आरोग्य ढासळत आहे.

अलिबाग-कुरूळ मार्गावर कचरा

रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोक्याच्या जमिनीवरील कांदळवने नष्‍ट करण्यासाठी त्‍या ठिकाणी घनकचरा टाकला जातो. अलिबाग-कुरुळ मार्गावर काही हेक्टर जमिनीवर भराव, कचरा टाकून कांदळवने नष्‍ट करण्यात आली आहेत. अशीच परिस्थिती जेएसडब्ल्यू ते पेण या मार्गावर दिसून येत आहे. दिवसेंदिवस कचऱ्याचे ढीग वाढत असून त्‍यामुळे कांदळवनांचा श्वास गुदमरत आहे.

कांदळवन संवर्धनासाठी अनेक उपाययोजना

कांदळवनांच्या रक्षणाकरिता राज्‍य सरकारने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. ज्यात स्वतंत्र कांदळवन कक्ष स्थापना करून स्थानिक सहभागातून अनेक शाश्वत उपजीविका जसे खेकडे पालन, जिताडा पालन, शोभीवंत मत्‍स्‍यपालन, कांदळवन निसर्ग पर्यटन आदींचा समावेश आहे. यामुळे किनारी भागातील रहिवाशांनाही रोजगार मिळू लागला आहे.

या शिवाय कांदळवन स्वच्छता मोहीम कांदळवनांमधील तोड किंवा अनधिकृत बांधकामे काढणे, कांदळ रोपांची लागवड, कांदळवनांच्या विविध पैलूंवर संशोधन, जनजागृती उपक्रम अशा अनेक बाबी राज्याच्या कांदळवन कक्ष वनविभागामार्फत राबवल्या जात आहेत.

घनकचरा व्यवस्थापनासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी व्यवस्था उभारण्याचे आदेश न्यायालयाचे आहेत. आता ज्या ठिकाणी कांदळवनावर डम्पिंग ग्राऊंड उभे राहिलेले आहेत, ती जागा महसूल विभागाची आहे की खासगी, यावरून वाद आहेत.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी कांदळवनांचे संवर्धन आवश्‍यक आहे, किमान तेथील कचऱ्याचे ढिगारे वाढू नये, अशी काळजी संबंधित यंत्रणेने घेणे आवश्यक आहे. पर्यावरण कायद्यानुसार, ही जागा वनविभागाकडे देणे आवश्यक आहे, ती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

- समीर शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कांदळवन कक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com