esakal | कंगना- संजय राऊत ट्विट वॉर, आज राऊतांची बाजू न्यायालयात होणार सादर
sakal

बोलून बातमी शोधा

कंगना- संजय राऊत ट्विट वॉर, आज राऊतांची बाजू न्यायालयात होणार सादर

आज दुपारी पुढील सुनावणी होणार असून राऊत यांच्या वतीने बाजू मांडण्यात येणार आहे. अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामधील सर्व ट्विट दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी कंगनाला दिले.

कंगना- संजय राऊत ट्विट वॉर, आज राऊतांची बाजू न्यायालयात होणार सादर

sakal_logo
By
सुनीता महामुणकर

मुंबई: अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामधील सर्व ट्विट दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी कंगनाला दिले. तसेच राऊत यांनी दिलेल्या एका मुलाखतीची DVD ही न्यायालयानं आता मागविली आहे. दरम्यान, कारवाई वेगाने झाली असली तरी ती बेकायदेशीर नाही, असा दावा पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आला. तर कारवाईमध्ये काहीतरी घोळ दिसतोय, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

पाली हिल येथील कंगनाच्या बंगल्यातील बेकायदेशीर बांधकामावर महापालिकेने नोटीस बजावून कारवाई केली आहे. याविरोधात तीने उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर सोमवारी न्या शाहरुख काथावाला आणि न्या रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू आहे. सरकार विरोधात ट्विट करून भूमिका मांडली म्हणून ही कारवाई करण्यात आली, असा दावा कंगनाच्या वतीने एड बिरेंद्र सराफ यांनी केला. 

तसेच राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधील काही ऑडिओ भागही न्यायालयात दाखल करण्यात आला. यामध्ये कंगनाला राऊत यांनी इशारा दिला आणि हरामखोर असा वादग्रस्त शब्द वापरला, असे सराफ यांनी सांगितले. मात्र राऊत यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही, असे त्यांच्या वतीने अॅड प्रदीप थोरात यांनी स्पष्ट केले. यावर त्यांनी हा शब्द याचिकादाराला वापरला नाही, असे नोंदवून घेऊ का, असा उलट सवाल खंडपीठाने केला. 

तसेच मुलाखतीची वेळ आणि कंगनाचे ट्विटची वेळही पहावी लागेल, असे महापालिकेचे विशेष वकील एस्पी चिनौय यांनी मांडले. त्यामुळे मुलाखतीची संपूर्ण DVD आणि ट्विट दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने कंगनाला दिले.

दरम्यान, मुंबई महापालिकेनं कंगनाच्या बंगल्यातील बांधकाम नियमानुसार नसल्याचा दावा पुन्हा एकदा न्यायालयात केला. केवळ विधाने केली म्हणून कारवाई केली अशी सबब सांगत बसण्यापेक्षा बांधकामावर मुद्दे मांडायला हवेत. विधानांची पळवाट काढून अवैध बांधकामाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे महापालिकेच्या वतीने अॅड चिनौय यांनी सांगितले. कंगनाने बांधकाम कधी केले याबद्दल अद्यापही खुलासा केलेला नाही, उलट कायद्याचा आधार घेऊन बेकायदेशीर बांधकाम दडवत आहे. या बांधकाम मुळे एफएसआयला बाधा येत आहे. त्यामुळे बांधकामावर उच्च न्यायालयात याचिका करण्यापेक्षा तीने दावा दाखल करायला हवा, असे ते म्हणाले. 

मला खुलासा करायला किंवा बांधकाम नियमित करण्याबाबत आकसाने पर्यायी यंत्रणांचा विचार करायला वेळ दिला नाही, असे कंगनाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र राऊत यांच्या मुलाखतीचा आणि महापालिका कारवाईचा काही संबंध नाही, असा युक्तीवाद महापालिकेच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने ही याचिका फेटाळून दावा दाखल करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी चिनौय यांनी केली. दोन्ही पक्षकारांनी न्यायालयात सत्य मांडण्याचे धाडस दाखवावे, असे खंडपीठाने सुनावले. आज दुपारी पुढील सुनावणी होणार असून राऊत यांच्या वतीने बाजू मांडण्यात येणार आहे.

कारवाईत घोळ

महापालिकेचे अधिकारी भाग्यवंत लाटे यांनी न्यायालयात कारवाईबाबत माहिती दिली. सर्वसाधारण पणे पोलिस पथक नेले जात नाही पण काही प्रकरणात नेतो, असे त्यांनी सांगितले. ८ सप्टेंबरला महापालिकेने अशीच एक कारवाई केली होती. पण त्यावेळी पोलिस पथक नेले नव्हते. तसेच त्याचे अहवाल आणि छायाचित्रेही ते दाखल करु शकले नाही. कंगनाच्या बांधकाम कारवाईचे छायाचित्रांवर वेळ आणि दिवस स्पष्ट होत नाही. यामुळे या कारवाईमध्ये काहीतरी घोळ आहे, असे खंडपीठाने पालिकेचे प्रमुख वकील अनील साखरे यांना सांगितले.

-----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Kangana Sanjay Raut tweet war Raut side will be presented in court today