करेन हर्नी - पहिली स्त्रीवादी मनोविश्लेषक  

धनंजय गांगल
शनिवार, 7 मार्च 2020

  • "पेनीस एनव्ही" म्हणजे स्त्रियांना पुरुष्यांच्या जनानेंद्रियांबद्दल हेवा असूया वाटणे आणि न्यूनगंड तयार होणे हे नैसर्गिक नसून, समाजातील स्त्री पुरुष असमानतेतून आले आहे.
  • स्त्रियांना पूरुष्याच्या लिंगाचा नाही तर विषम सामाजिक परिस्स्थितीत पुरुषांकडे स्त्रियांपेक्षा जी जास्त सत्ता एकवटली आहे - प्रत्येक्षात त्याचा हेवा वाटतो.

करेन हर्नी ही बाई जर्मन विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील महत्वाची मनोविश्लेषक आणि मानसोपचारतज्ञ. किंबहुना स्त्रीवादी मनोविश्लेषणाचा पाया तिने रचला असे म्हणता येईल. तिचा जन्म १९८५ जर्मनी.  तिचा कार्यकाळ साधारण १९१० ते १९५२.  तिच्या मृत्यपर्यंत ती सतत कार्यरत होती.  साधारण १९१३ साली "युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन" मधून ती वैद्यकीय क्षेत्रात एम डी झाली. १९२० मध्ये काही सहकाऱ्यांसोबत तिने "बर्लिन सायकोऍनालिटिक इन्स्टिट्यूट" ची स्थापना केली. १९३२ साली फ्रान्झ अलेक्झांडर याच्या निमंत्रणावरून ती अमेरिकेला "शिकागो इन्स्टिट्यूट ऑफ सायकोऍनालीसीस" येथे त्याची सहकारी म्हणून रुजू झाली. त्यानंतर दोन वर्षांनी ती ब्रुकलिन येथे राहावयास गेली. १९३०, ४० च्या दशकात ब्रुकलिन येथे वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक बुद्धीवंतांची मांदियाळी होती. तिथेच तिने आपले उर्वरित आयुष्य व्यतित केले.

तो काळ हा जगप्रसिद्ध सिगमंड फ्रॉइड (१८५६-१९३९) या मनोविश्लेषक आणि मानसोपचारतज्ञ याचा प्रचंड प्रभाव असलेला काळ होता. मनोविश्लेषणाच्या  क्षेत्रात, त्याच्या विचारांहून वेगळा विचार मांडणं हे जवळपास पाप समजले जाई. किंबहुना तिचे तर निरीक्षण असे होते की हे विज्ञानाचे क्षेत्र असूनही या क्षेत्रात झापडबंदपणा आला असून-कुठलाच वेगळा विचार स्वीकारला जात नसे.  ब्रुकलिन ला असताना ती "न्यूयॉर्क सायकोऍनालिटिक इन्स्टिट्यूट"  येथे व्याख्याता म्हणून जात असे. इथेच तिची भेट एरिक फ्रॉम आणि हॅरी सुलिव्हान या दोन मनोविश्लेषण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिंशी झाली. त्यांच्याच प्रोत्साहनाने तिने "व्यक्तिमत्व" आणि मनोविश्लेषणाबद्दल  स्वतःचे सिद्धान्त मांडायला सुरवात केली. फ्रॉइड पेक्षा वेगळे काही मांडणे हे स्वीकारःच नव्हते आणि त्यामुळेच तिची "न्यूयॉर्क सायकोऍनालिटिक इन्स्टिट्यूट" मधून गच्छन्ति अटळ होती. ती फ्रॉइड ची विद्यार्थी नव्हती पण फ्रॉईडला तिची, तिच्या कामाची पूर्ण जाणीव होती. एक शास्त्रज्ञ म्हणून खरे तर त्याने तिला प्रोत्साहन द्यायला पाहिजे होते. पण त्याने "नरो-वा-कुंजरोवा" अशीच भूमिका घेतली. तिच्या अस्तित्वाची दखलही त्याने कधीच घेतली नाही. अशी "न्यूयॉर्क सायकोऍनालिटिक इन्स्टिट्यूट" मधून गच्छन्ति झाल्यावर तिने काही सहकाऱ्यांसोबत "अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सायको-अनालयसिस" या संस्थेची आणि " अमेरिकन जर्नल  ऑफ सायको-अनालयसिस" यांची स्थापना केली. या इन्स्टिटयूट मध्ये मग ती तिच्या मृत्यपर्यंत ( १९५२) शिकवत राहिली.

फ्रॉइड ने मनोविश्लेषणात स्त्री आणि पुरुष हे मुलतः वेगळे असल्याचे मांडले. "पेनीस एन व्ही" हा त्याचा एक सिद्धांत. पुरुषांप्रमाणे लिंग नसल्याने स्त्रियांना आपण कमी पडतोय असा न्यूनगंड तयार होतो आणि त्यातून त्यांची एक पराभूत मनोभूमिका तयार होते आणि म्हणून स्त्री व पुरुष यांचे मानसशास्त्र निसर्गतः वेगळे असते - हे त्याचे सार. हर्नि ने हा खोडून काढला. "ओडिपल कॉम्प्लेक्स" म्हणजे मुलाचा आईकडे आणि मुलीचा बाबांकडे निसर्गतः ओढा असणे हा फ्राईड चा अजून एक सिद्धधांत. हर्नि ने तोही खोदून काढला.

तिच्या मते "पेनीस एनव्ही" म्हणजे स्त्रियांना पुरुष्यांच्या जनानेंद्रियांबद्दल हेवा असूया वाटणे आणि न्यूनगंड तयार होणे हे नैसर्गिक नसून, समाजातील स्त्री पुरुष असमानतेतून आले आहे. स्त्रियांना पूरुष्याच्या लिंगाचा नाही तर विषम सामाजिक परिस्स्थितीत पुरुषांकडे स्त्रियांपेक्षा जी जास्त सत्ता एकवटली आहे - प्रत्येक्षात त्याचा हेवा वाटतो. मुलीला वडिलांचे आकर्षण हे -  आईपेक्षा त्यांच्याकडे असलेल्या जास्त सत्तेचे असते.  पुढे जाऊन तिने पूरुष्यांच्या "वूम्बस एनव्ही" म्हणजे पुरुषांना स्त्रियांच्या गर्भाशयाचा आणि त्यामुळे तिला चक्क नवीन जीव जन्माला घालता येतो - या तिच्या सर्जनशीलतेचा हेवा वाटतो, या सिध्दांताची मांडणी केली. या स्त्री पुरुष असमानते मुळे पुरूषाला स्वतःला सतत सिद्ध करण्याचा दबाव असतो, स्त्रियांना तो तेवढा नसतो. आणि ह्याचेही कुठेतरी पुरुषांना आकर्षण आणि सुप्त असूया असते. आपण स्त्रीप्रमाणे निर्मिती करु शकत नाही या जाणिवेतून आणि त्यातून येणाऱ्या अगतिकतेमुळे पुरुष सतत स्वतः ला सिध्द करण्यासाठी धडपडत असतो. जास्त सत्ता, उच्च पद या मागे लागतो. सतत दुसऱ्यांवर सत्ता गाजवण्याची त्याची धडपड या अगतिकतेतूनच येते.

तिने "स्त्रियांचे मानसशास्त्र" आणि "न्यूरोसिस" या विषयांवर बरीच पुस्तके लिहीली. आयुश्या च्या शेवटच्या टप्प्यात ती आत्मशोध"कडे वळली. पण सरतेशेवटी करेन हर्नि लक्षात राहते ती फ्रॉईड च्या काही सिध्दांताना आव्हान देणारी आणि स्वतःची वेगळी  ओळख निर्माण करणारी आगळी वेगळी व्यक्ती म्हणून.

(या लेखातील मते लेखकाची वैयक्तिक आहेत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karen horney was the first faminist